Wardha River Water Level
चंद्रपूर : कमी पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बल्लारपूर वासियांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या वर्धा नदीमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा नाही. त्यामुळे उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील उन्हाळ्यापर्यंत टिकविणे आवश्यक आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी वर्धा नदीवरील सुधारीत बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा – 2 ची पाहणी करून यंत्रणेला निर्देश दिले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, बल्लारपूर वासियांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सुधारीत बल्लारपूर पाणी पुरवठा योजना टप्पा – 2 मधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात पाण्याचे संकट आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता बल्लारपूर नगर परिषद प्रशासनाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. बंद पडलेल्या बोअरिंग आणि विहिरींची दुरुस्ती करावी. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे सिमेंटीकरण करावे. ज्या विहिरींचे पाणी नागरिक वापरत नाही, अशा विहिरी पाणी पातळी वाढविण्यासाठी उपयोगात पडू शकतात का, याबाबत नियेाजन करावे. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत नागरिकांमध्ये आतापासून जनजागृती करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या.
सन 2011 च्या जनगणनेनुसार बल्लारपूर शहराची लोकसंख्या 89472 असून सन 2050 पर्यंत अंदाजीत लोकसंख्या 1 लक्ष 43 हजार राहू शकते. सन 2020 मध्ये पाण्याची गरज प्रतिदिन 19.15 दस लक्ष लीटर होती. सन 2050 पर्यंत ही गरज 26.69 दस लक्ष लीटर /प्रतिदिन राहू शकते. सध्या बल्लारपूर शहरात एकूण 11010 नळजोडणी आहे. शहराला नियमित करण्यात येणारा पाणीपुरवठा 17 दस लक्ष लीटर आहे. सद्यस्थितीत 10 टक्के कपातीनंतर 15 दस लक्ष लीटर पाणी पुरवठा चालू आहे. वर्धा नदिपात्रातील पुरेसा पाणीसाठा फेब्रुवारी 2027 अखेरपर्यंतचा असून संभाव्य पाणी टंचाई करीता निम्न वर्धा प्रकल्पातून मार्च ते ऑगसट 2027 पर्यंत 2.65 द.ल.घ.मी. आवश्यक आरक्षण करण्याचे नियोजन आहे.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, तहसीलदार रेणूका कोकाटे, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी, मुकेश धकाते, हरीश शर्मा आदी उपस्थित होते.
रेडीयल वेल पंप हाऊस, ॲप्रोच ब्रिज, अस्तित्वातील हेंडवर्कसची सुधारणा, अशुध्द पाण्याची उर्ध्वनलिका, जलशुध्दीकरण केंद्राची सुधारणा, शुध्द पाण्याची उर्ध्वनलिका, विद्यानगर येथे मुख्य संतुलन टाकी, शुध्द पाण्याची गुरुत्वनलिका, जलशुध्दीकरण केंद्र परिसरातील पाण्याची उंच टाकी, दिनदयाल वॉर्डातील पाण्याची उंच टाकी, कन्नमवार वॉर्डातील पाण्याची उंच टाकी, वितरण व्यवस्था, अस्तित्वातील पाण्याच्या उंच टाकीची दुरुस्ती तसेच किरकोळ कामे पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता संजय अष्टगी यांनी सांगितले.