Bramhapuri Launches Vidarbha Biggest Digital Library
चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरात १० कोटी रुपयांच्या निधीतून उभारली जात असलेली विदर्भातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक ई-लायब्ररी अंतिम टप्प्यात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची नुकतीच आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली. येत्या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांसाठी ही लायब्ररी खुली करण्याचा निर्धार व्यक्त करत, कामांना गती देण्यासोबतच प्रत्येक बाबतीत उच्च दर्जा राखण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या ई-लायब्ररीत सुमारे २०० विद्यार्थ्यांसाठी आसन क्षमता असून, त्यातील ५० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणकीय प्रणालीसह तंत्रज्ञानयुक्त बैठक व्यवस्था उभारली जात आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IIT खडगपूर या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेसोबत ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा येथे उपलब्ध असणार आहे. शिवाय, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली दर्जेदार पुस्तके व अभ्यास साहित्यही या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र मुला-मुलींचे स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा आणि प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी सुसज्ज हॉल या लायब्ररीत उभारण्यात येत आहे. ब्रम्हपुरीतील ही ई-लायब्ररी केवळ शहरासाठी नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरणार आहे.