Chandrapur unseasonal rain crop damage
चंद्रपूर : विदर्भासह चंद्रपूर जिल्ह्यावर आलेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावाने अवकाळीच्या तडाख्यात जिल्ह्यात धान सोयाबीन व कापूस पिक सापडले आहेत. बुधवारी रात्रीभर झालेल्या अवकाळी पावसाने धान, सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. शेतात कापून असलेल्या धानाच्या कळपा पावसाने भिजल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याखाली आल्या आहेत. त्यामुळे कळपांना कोंबे फुटण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जाहीर केलेल्या यलो अलर्टनंतरही पावसाचा जोर अपेक्षेपेक्षा अधिक होता. त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटाच्या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मोंथा चक्री वादळाचा धोका निर्माण झाला. त्याच्या प्रभावाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळीने झोडपून काढले आहे. चंदपूर जिल्ह्यात सोमवारपर्यंत वातावरण निरभ्र होते. त्यानंतर मोंथा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोंथाचा प्रभाव बुधवारी रात्रीपासून पहायला मिळाला. वातावरणात अचानक बदल झाला. बुधवारी रात्रभर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. आज गुरुवारी दुपार पर्यंत जिल्ह्यात रिमझिम पावसाचे सत्र सुरूच होते. या अवकाळीचा फटका मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली, गोंडपिपरी, चंद्रपूर व बल्लारपूर वधान उत्पादक तालुक्यांतील धानाला बसला. शिवाय अन्य तालुक्यातील सोयाबीन व कापसाचेही नुकसान झाले आहे. धान उत्पादक भागात अवकाळीने शेवटच्या टप्यातील धानपिकांचे मोठे नुकसान केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक असून, हलके, मध्यम आणि जड जातींची लागवड करण्यात आली आहे. हलके आणि मध्यम धानाची कापणी सुरू होती, तर जड जातीचे धान अजून १५ ते २० दिवस शेतात उभे राहणार आहे. पण या अवकाळीमुळे आधीच कापणी केलेल्या धानाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी हार्वेस्टर तर अनेक शेतकरी महिल मजूर लावून धानाची कापणी करीत आहेत. हार्वेस्टर द्वारे कापणी केलेले धान रस्त्याच्या कडेला किंवा बांधावर वाळवण्यासाठी ठेवले होते, परंतु ते पूर्णपणे पाण्याने भिजले आहेत. तर हलके व मध्यम धानाचे कापणी केलेल्या कळपा बांधावरच भिजल्या आहेत. कळपा पावसाने भिजल्याने त्यांचे सध्यातरी भारे बांधता येणार नाही. त्यांना वाळविण्यासाठी उन्हाची गरज भासणार आहे. परंतु सध्या हवामान खात्याने वर्तविलेलल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काही ठिकाणी शेतशिवारात पाणी साचल्यामुळे कळपावरील धानाला कोंब फुटण्याची शक्यता आहे. शेकडो हेक्टरवरील धानपिक अवकाळीमुळे बाधित झाले असून, शेतकऱ्यांनी मोठे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. एकदरीत पावसात ओल्या झालेल्या धानपिकाला बाजारपेठेत खबरा ठरवून कवडीमोल भावाने विकायची पाळी येणार असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे म्हणने आहे. काल बुधवारच्या रात्रीपासून सुरू झालेला पाऊस लवकर निघाला नाही तर सोयाबीन व कापसाप्रमाणे धान उत्पादकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख व्यापारी पिके आहेत. यापूर्वीच खराब झालेल्या सोयाबीनपिकावर शेतकऱ्यांनी शेवटच्या आशा ठेवलेल्या होत्या. मात्र, या अवकाळी पावसामुळे उरलेले पीकही भिजल्याने पूर्णतः नष्ट होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करणे सोडून दिले आहे. कोणी ट्रॅक्टर किंवा रोटावेटरने पीक नष्ट केले, तर काहींनी थेट शेतात आग लावून ते संपवले आहे. कापूस पिकही या पावसात ओले झाले असून, त्यामुळे कापसाच्या गोळ्यांवर काळेपणा येऊन दर्जा खालावण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात दर घसरतील, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.
खरिपातील आधीच झालेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही न मिळालेली असताना पुन्हा एकदा चक्रीवादळाच्या प्रभावाने अवकाळी पावसाचे संकट कोसळले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. शेतकऱ्यांचे धान, कापूस आणि सोयाबीनवरील संपूर्ण वर्षाचे श्रम वाया गेले आहे. आता त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी आणि पूनर्लागवडीच प्रश्न निर्माण होणार आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्तविली आहे