Rudraksha Tulsi Bead Ganesh Idol
चंद्रपूर: रुद्राक्ष आणि तुळशीमाळांच्या पवित्र मण्यांचा अनोखा संगम साधत वरोरा येथील मिलन चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘मिलन चौकाचा राजा’ची आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे. तब्बल ५५०८ रुद्राक्ष आणि १००८ तुळशीमाळांचा वापर करून साकारलेली ही मूर्ती गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत असून, या अनोख्या संकल्पनेतून अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.
वाढत्या दिखाऊपणाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाला अध्यात्म आणि भारतीय परंपरेची जोड देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. भगवान शिवाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षासोबत विष्णू भक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या तुळशीमाळांचा वापर करून गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. रुद्राक्षांचा नैसर्गिक रंग आणि तुळशीमाळांची शुभ्रता यांचा सुंदर मिलाफ मूर्तीच्या रूपाला विशेष आकर्षण प्राप्त करून देत आहे.
मंडळाचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर (माजी सैनिक तथा नगरसेवक) यांनी पुढारीशी बोलताना सांगितले की, केवळ वेगळी मूर्ती साकारण्याचा उद्देश नसून आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना पुन्हा अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडण्याचा प्रयत्न आहे. रुद्राक्ष आणि तुळशीमाळांच्या माध्यमातून समाजाला पवित्र संदेश देण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी मंडळातील तरुण आणि कलाकारांनी मोठी मेहनत घेतली. प्रतीक कुंभारे, रवी चिकाटे, करण ढेंगळे, तेजस कुंभारे, मंथन गज्जलवार, चैतन्य गज्जलवार, ओम मेश्राम, लखन पवार, आशिष मोगरे आणि नितेश परचाके यांनी मूर्तीच्या सजावटीची जबाबदारी सांभाळली. तसेच रिद्धी-सिद्धी नक्षी यांनी आपल्या कलाकौशल्यातून मूर्तीच्या सौंदर्यात भर घातली.
विशेष म्हणजे, कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर न करता ही संकल्पना साकारण्यात आल्याने पर्यावरणपूरक विचारालाही प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे भक्ती आणि कलाकौशल्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या मूर्तीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव बंडू मेश्राम आणि कोषाध्यक्ष सुनील गज्जलवार यांनी विशेष मार्गदर्शन व परिश्रम घेतले. राजेश पोलशेट्टीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून साई गणेश मंडळ आणि प्रसन्न गणेश मंडळ यांनीही विशेष सहकार्य केले.
रुद्राक्ष आणि तुळशीमाळांच्या माध्यमातून साकारलेला ‘मिलन चौकाचा राजा’ हा केवळ गणेशभक्तीचा अनोखा आविष्कार न राहता अध्यात्म, भारतीय संस्कृती, कलाकौशल्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी संकल्पना म्हणून लक्ष वेधून घेत आहे.