चंद्रपूर : जनावरे चारण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या काका-पुतण्यावर वाघाने अचानक हल्ला केल्याची भीषण घटना कोसंबी चक परिसरात गुरुवारी (22 मे) सकाळी घडली. या हल्ल्यात बंडू परशुराम उराडे (वय ५५) या काकाचा जागीच मृत्यू झाला असून, किशोर मधुकर उराडे (वय ३५) हा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे.
घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून, मागील १३ दिवसांत वाघाच्या हल्ल्यात ९ जणांचा बळी गेला आहे, त्यातील ४ जण हे एकट्या मूल तालुक्यातील आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल तालुक्यातील करवन येथील काही गुराखी आज गुरूवारी (22 मे) सकाळी सात वाजता गावापासून तिन किमी अंतरावरील कोसबी चक शेतशिवारात जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यामध्ये काका बंडू उरोडे व पुतण्या किशोर उराडे यांचा समोवश होता. जनावरे चरत असताना गुराखी ही वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते. दरम्यान आठच्या सुमारास त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने 55 वर्षीय काका बंडू परशुराम उराडे याच्यावर हल्ला चढविला.
काही अंतरावर असलेल्या पुतण्या किशोर मधुकर उराडे याला वाघाने काकावर हल्ला केल्याचे लक्षात आले. लगेच काकाला वाचविण्यासाठी तो धावून आला. त्याने काकाला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु काका बंडू उराडे हा जागीच ठार झाला. वाघासोबत प्रतिकार करताना पुतण्या किशोर गंभीर जखमी झाला. त्यानंतर वाघ पळून गेला.
काका पुतण्या दोघेही गुराखी होते. सदर घटनास्थळाच्या काही अंतरावर अन्य तिन गुराखी जनावरे चारत होती. त्यांनाही ही घटना लक्षात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन बघितले असता बंडू उराडे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तर पुतण्या किशोर उराडे हा जखमी अवस्थेत होता. लगेच या घटनेची माहिती करवन गावात देण्यात आली. पोलिस व वनविभागालाही माहिती मिळाली. नागरिक वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
जखमीला मुल येथे रूग्णालयात हलविण्यात आले. एकाच वेळी दोघांवर वाघाने हल्ला केल्याने करवन परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. सतत वाघाच्या हल्यात शेतकरी, शेतमजूर, गुराख्यांचे जिव जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. जमावाने वाघाची ताबडतोब बंदोबस्त करण्याची वनाधिकाऱ्यांसमोर लावून धरली.
10 मे पासून आजपर्यंत एकूण तेरा दिवसात 9 जणांचा वाघाच्या हल्यात बळी गेला आहे. त्यापैकी 7 जण हे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेले होते. एक जण बकरी करीता चारा आणण्यासाठी तर एक जण जनावरे चारण्यासाठी गेला होता. आजच्या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. नागरिकांकडून वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे वनविभागावर संताप व्यक्त होत आहे. वनविभाग नागरिकांवर होणारे वाघांचे हल्ले रोखण्यास अपयशी ठरला आहे. वाघांचे हल्ले काही थांबता थांबत नसल्याने मृतांचा आकडा दर दिवशी वाढतच आहे. मुल तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात दशहत पसरली आहे. शेतीचे कामे, जनावरे चारण्यावर संकट ओढालेले आहे.
वाघांचा बंदोबस्त करण्याची सतत मागणी येथील नागरिक करीत असतानाही वनविभाग बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे 10 मे पासून आज गुरूवारपर्यंत तेरा दिवसात नऊ जणांचे बळी गेले आहेत, दर दिवशी वाघांच्या हल्यात नागरिकांचे बळी जात आहेत.
10 मे - सिंदेवाही तालुक्यातील एकाच दिवशी 3 महिलांचा मृत्यू
11 मे - मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू
12 मे - मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू
14 मे - चिमूर तालुक्याती एका महिलेचा मृत्यू
18 मे - नागभिड व मुल तालुक्यातील दोघा इसमांचा मृत्यू
22 मे - पुन्हा मुल तालुक्यातील एकाचा मृत्यू व एक जखमी