चंद्रपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे अनेकदा चर्चा रंगतात. कधी राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेल्याच्या बातम्या, तर कधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका मंचावर आल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये झळकताना दिसतात. मात्र, या भेटींमुळे अनेकदा राजकीय तर्कवितर्क लावले जातात.
या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट मत मांडले आहे की, दोघांनी एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी. “उद्धवजी आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्यावर कुणाचाही आक्षेप नाही. कामगार संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी एकत्र येऊन काम केले होते. आता त्यातून पुन्हा सकारात्मक दिशा निर्माण होऊ शकते. दोघे एकत्र आले तर अनेक चर्चांना पूर्णविराम मिळेल. नुसत्या चर्चांत वेळ वाया न घालवता त्यांनी ठोस निर्णय घ्यावा.”
ते पुढे म्हणाले की, “दोघे भाऊ एकत्र आले तर काही मोठे घडेल अशी हवा निर्माण केली जाते, पण नंतर त्यातून काहीही घडत नाही. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन कार्यरत राहिल्यास हा विषय पूर्णपणे संपुष्टात येईल. अशी प्रतिक्रिया राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.