Accident Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Accident : सेव्हन सिस्टर पेरजागडावरून परतणाऱ्या दुचाकीला अपघात; तरुण-तरुणी गंभीर

गोविंदपूर–सोनापूर मार्गावरील खाटीक नाल्याजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील सोनापूर गावालगत असलेल्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर (सात बहिणी) पेरजागड पर्यटनस्थळावरून परतणाऱ्या भरधाव दुचाकीस्वाराची समोरून येणाऱ्या चारचाकीला जोराची धडक बसली. या घटनेत दुचाकीवरील तरूण व तरूणी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.२) सायंकाळी ६ वाजता गोविंदपूर–सोनापूर मार्गावरील खाटीक नाल्याजवळ घडली.

जखमींना ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तर चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून त्यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

नागभीड तालुक्यातील सोनापूर गावालगत असलेले सात बहिणी पेरजागड (सेव्हन सिस्टर) हे पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी येथे हजारो पर्यटक भेट देत असून, विशेषतः तरुण-तरुणी दुचाकींवरून मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र आहे.

रविवारीही हजारो पर्यटकांनी पेरजागडावर गर्दी केली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चंद्रपूरकडे परतणाऱ्या पर्यटकांपैकी एका दुचाकीस्वाराने गोविंदपूर–सोलापूर मार्गावरील खाटीक नाल्याजवळ समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील तरुण व त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून दोघांनाही ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले असून त्यामधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सेव्हन सिस्टर पेरजागड परिसरात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही ठोस सुविधा उपलब्ध नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तळोधी–गोविंदपूर–सोनापूर तसेच चिंधीचक–मांगरूड–गोविंदपूर या मार्गांवरून पर्यटक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अनेकजण भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात या मार्गावर सुमारे २० अपघात घडले आहेत. मात्र, तरीही वाहतूक नियंत्रणासाठी किंवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्याची बाब चिंतेची आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच पोलीस किंवा वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचतात, अशी तक्रारही नागरिकांनी केली.

गोविंदपूर, सोनापूर आणि मांगरूड या गावांमधून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाहतूक होत असल्याने गावातील नागरिकांनाही सतत धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, इशारा फलक, वेगमर्यादा आणि आवश्यक मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT