धक्‍कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात दोन हत्तींनी घेतला वृद्धाचा जीव, पायाने चिरडून सोंडेने आपटले File Photo
चंद्रपूर

धक्‍कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात दोन हत्तींनी घेतला वृद्धाचा जीव, पायाने चिरडून सोंडेने आपटले

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Two elephants crushed an elderly man to death in Chandrapur district

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी (१५ जून) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

मारोती कवडू मसराम (वय ६०, रा. जाटलापूर) असे मृत व्यक्‍तीचे नाव असून, पॅरालिसिसमुळे  मसराम यांना पळता न आल्यामुळे हत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने त्यांना पायाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेने उचलून जमिनीवर आदळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आज रविवारी सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावातील काही शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडे जात असताना गावालगतच्या जंगलातून अचानक हे दोन्ही हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्यांचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. याच दरम्यान मारोती मसराम हे शौचासाठी घराबाहेर पडले होते. अपंगत्वामुळे ते पळू शकले नाहीत. हत्तींनी त्यांच्याकडे धाव घेत एकाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेत उचलून आदळले. ही दुर्दैवी घटना पाहून शेतकरी हादरले.

घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी गावात धाव घेत ही माहिती दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटलांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे पाठवण्यात आला. मसराम यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुलांचा परिवार आहे. घटनेनंतर वन विभागाने दोन्ही हत्तींचा शोध घेणे सुरू केले आहे. हत्ती घटनास्थळावरून इतरत्र पळाले आहेत. वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत.

सदर दोन हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून उमा नदी पार करत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आले आहेत. तेव्हापासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची सतत हालचाल सुरू आहे. काही गावांत ते शिरले असून, नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जाटलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र संताप आणि भीती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडून तत्काळ हत्ती नियंत्रणात घेण्याची आणि मानवहानी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT