आदिवासी लोककला महोत्सवाचे कोरपना येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री आशीष शेलार, पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार देवराव भोंगळे आदी उपस्थित होते.  Pudhari Photo
चंद्रपूर

आदिवासी समाजाच्या योगदानातून देशाची प्रगती : सुधीर मुनगंटीवार

आदिवासी लोककला महोत्सवाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : आदिवासी समाजात प्रचंड क्षमता आहेत. ते पराक्रमी आणि प्रामाणिक आहेत. कष्ट करायला कधीही मागेपुढे बघत नाहीत. या आदिवासी समाजाच्या योगदानातूनच देश प्रगतीच्या मार्गावर जाणार आहे. असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी लोककला महोत्सवाचे कोरपना येथे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके अध्यक्षस्थानी होते. राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे, एसडीएम रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखरे, पीओ विकास राचलवार, कोरपनाचे सीओ धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुनगंटीवार म्हणाले, आजच्या महोत्सवाकडे फक्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या चौकटीतून बघता येणार नाही. कारण काल गुढीपाडवा होता आणि अत्यंत कष्टकरी असा आदिवासी समाज लोककला व संस्कृतीच्या माध्यमातून प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी उत्तम दिवस आहे. मिशन ऑलिम्पिक २०३६ मध्ये चंद्रपूर-गडचिरोलीचे आदिवासी तरुण-तरुणी झळकतील आणि देशासाठी पदक आणतील, असे वातावरण आपल्याला तयार करायचे आहे. त्यासाठी सरकार पूर्णपणे आदिवासी समाजाच्या पाठिशी उभे राहील, असा विश्वास आहे. व्यक्त करून आदिवासी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यासाठी करंजी आणि पोंभुर्णा येथे आदिवासींसाठी समर्पित एमआयडीसी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री म्हणून जनसेवकाचा आदर्श सुधीर भाऊंनी निर्माण केला : ना. आशिष शेलार

मंत्री म्हणून जनतेची सेवा कशी करायची याचे आदर्श उदाहरण म्हणून आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बघतो. त्यांना आम्ही ‘चंद्रपूरचे रत्न’मानतो, या शब्दांत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशीष शेलार यांनी आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

ते म्हणाले, ‘आज मी जिथे उभा आहे, ते महाराष्ट्राचे टोक आहे. पण आजचा कार्यक्रम बघून, आदिवासींची ऊर्जा बघून, लोकसाहित्य-संस्कृती बघून भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये आदिवासींचाच आवाज बुलंद होईल याची शाश्वती मिळत आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या आणि येथील आदिवासींच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असे वचन दिले. आदिवासी लोककला महोत्सवाचा आवाज, येथील लोकगीते, संगीत-नृत्य, नाटिका संपूर्ण महाराष्ट्रभर घेऊन जायचे आहे. चित्रपटांमध्येही आदिवासी संस्कृती प्रदर्शित झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल समीट मुंबईत होणार आहे. जगभरातील कलावंत, लेखक यात सहभागी होतील. तिथे आदिवासी लोककलांचे सादरीकरण करण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रण देतोय, असेही ना. आशीष शेलार म्हणाले.

निधी कमी पडू देणार नाही - ना. अशोक उईके

पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या लोककला आणि संस्कृतीचा व्यापक दृष्टिकोन ठेवून विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा समाज देव, धर्म आणि संस्कृतीचे पालन करणारा आहे.कोरपना येथील लोककला आणि संस्कृतीचे दर्शन वाखाणण्याजोगे आहे. आदिवासी समाजाची समृद्ध आणि आदर्श संस्कृती आहे.चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून या आदिवासीबहुल भागाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT