Tiger Attack On Farmer pudhari
चंद्रपूर

Tiger Attack On Farmer: हरवलेल्या शेळीच्या शोधात शेतकरी जंगलात गेला तो परत आलाच नाही... वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

Anirudha Sankpal

Tiger Attack On Farmer:

चंद्रपूर (पुढारी वृत्तसेवा) : नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे एका हरवलेल्या शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलात गेलेल्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आत्माराम दसरू बोरकर (वय ५२) यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गिरगाव येथील रहिवासी आत्माराम दसरू बोरकर हे गुरुवारी (दि. १८ जून) नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर एक शेळी जंगलातच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. पशुपालन हा त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने त्यांनी वेळ न दवडता हरवलेल्या शेळीचा शोध घेण्यासाठी पुन्हा जंगलाची वाट धरली.

मात्र, रात्र झाली तरी आत्माराम बोरकर घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. पत्नी, मुले आणि नातेवाईकांनी रात्रभर त्यांच्या परतीची वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक हिंगणघर, पोलीस निरीक्षक राहुल गुहे व त्यांच्या पथकासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली असून मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आत्माराम बोरकर हे परिसरात कष्टाळू, शांत व मनमिळावू शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावाने एक मेहनती व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि मानव-वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT