चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
लग्न होऊन मुलगी सासरी गेली. त्यानंतर काही वर्षांनी ती वडिलांकडे घरी आली. वडिलांच्या घरी राहिली असताना आज सोमवारी ( 12 मे) रोजी ती आई, वडील, काका, काकू व पतीसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी भादुर्णाच्या जंगलात गेली. तेंदुपत्ता तोडत असतानाच पतीच्या समोरच वाघाने अचानक विवाहितेवर हल्ला चढविला. या हल्ल्यात ती जागीच ठार झाली.
ही घटना आज सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मूल तालुक्यातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये घडली. भूमिका दिपक भेंडारे असे विवाहतेचे नाव आहे. घटनेनंतर मृतदेह उचलण्यास महिलेच्या कुटुंबीयांनी नकार दिला. यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृतक महिलेच्या कुटुंबीयांची व नागरिकांनी समजून काढल्याने मृतदेह उचलण्यात आला.
मूल तालुक्यातील भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी भूमिका हिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे सोबत झाला होता. काही वर्ष सासरी राहीली. त्यानंतर ती वडीलांकडे भादुर्णा येथे राहायला आली होती. येथेच स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत होते.
आज सोमवारी सकाळी भादुर्णा जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी आई, वडील, काका, काकू आणि पत्तीसह बफर क्षेत्रातील भादुर्णा बिटातील 793 मध्ये विवाहिता सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गेली होती. जंगलात तेंदुपत्ता तोडत असतानाच त्याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने विवाहितेवर अचानक हल्ला केला. हल्ल्यात ती जागीच ठार झाली. वाघाने हल्ला केला तेव्हा काही अंतरावर असलेल्या आई, वडील आणि पतीने आरडाओरड करून तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. वाघ पळून गेला, परंतु वाघाच्या हल्ल्यात पती समोरच विवाहितेचा जीव गेला.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावकरी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले. कालच नागाळा येथे एका वृद्ध महिलेचा वाघाने जीव घेतल्याने प्रचंड दहशत पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही आणि मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.
लगेच वरिष्ठांना पाचारण पाचारण करण्यात आले. मृताच्या कुटुंबियांची आणि नागरिकांची समजूत घातली. बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलले जातील, अशी हमी दिली. तसेच पुस्तकाच्या कुटुंबीयांना तातडीने रोख पन्नास हजाराची आर्थिक मदत केली. एक तासापर्यंत घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वरिष्ठांनी नागरिकांचे समजून घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निवळले.
त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर शव उत्तरीय तपासणीकरीता मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. काल रविवारी याच मूल तालुक्यात नागाळा येथील एका वृद्ध महिला व शनिवारी मूल तालुक्याला लागून असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल गावातील एकाचवेळी तीन महिलांना वाघाने ठार केल्याची थरारक घटना ही ताजीच आहे.
दोन दिवसातील वाघाच्या हल्ल्यातील आजचा पाचवा बळी आहे. मुल आणि सिंदेवाही तालुक्यात दोन दिवसांमध्ये पाच जणांचा बळी गेल्याने वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिक जोरदार मागणी करीत आहेत. परंतु वन विभाग मात्र बंदोबस्त करण्यास अपयशी ठरला आहे.