चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील जंगल परिसरात रविवारी (३१ मे) सकाळी एका पट्टेदार वाघाने गुराख्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. दिलीप जानबा नन्नावरे (वय ४५) असे मृत गुराख्याचे नाव आहे. वाघाने हल्ला केल्यानंतर नन्नावरे यांचा मृतदेह जंगलात तब्बल ५०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कमालीची घबराट पसरली आहे.
मोटेगाव येथील रहिवासी दिलीप नन्नावरे हे नेहमीप्रमाणे आपल्या १५ ते २० बकऱ्या चारण्यासाठी तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोटेगाव जंगल परिसरातील कक्ष क्रमांक ३८ मध्ये गेले होते. मोटेगाव ते पेंढरी मार्गावरील बद्री पहाडीच्या खाली ते बकऱ्या चारत असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.
वाघाच्या हल्ल्यानंतर घाबरलेल्या बकऱ्या सैरावैरा पळत घरी परतल्या. मात्र, दुपार झाली तरी दिलीप घरी न आल्याने मुलाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण प्रतिसाद मिळाला नाही. कुटुंबियांनी मुलांसह जंगलात शोध घेतला असता, तिथे दिलीप यांचे फाटलेले कपडे आणि कुऱ्हाड आढळून आली. मुलांनी गावात धाव घेत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी जंगलात मोठी शोधमोहीम राबवली. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावर दिलीप यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
विशेष म्हणजे, रविवारी सकाळी आठच्या सुमारास याच परिसरातील रोपवाटिकेला पाणी देणाऱ्या महिला मजुरांना हा वाघ रस्ता ओलांडताना दिसला होता. काही इतर नागरिकांनीही वाघाला जंगलाच्या दिशेने जाताना पाहिले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच हा दुर्दैवी प्रकार घडला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार, वनरक्षक केशव पाटील यांच्यासह वनविभागाचे पथक आणि चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
मृतक दिलीप नन्नावरे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वनविभागाने मृतकाच्या कुटुंबाला तातडीची ५० हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली असून, उर्वरित नुकसानभरपाई लवकरच दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
"मोटेगाव आणि परिसरातील जंगलात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी आणि गुराख्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने केवळ आर्थिक मदत न देता, नरभक्षक बनू पाहणाऱ्या या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि परिसरात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात," अशी आक्रमक मागणी मोटेगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.