पुढारी डेस्क : धनगर, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. धनगर समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी करत सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे धनगर बांधवांनी महामार्गावर मेंढ्या आणि खेचरांसह एकत्र येत महामार्गावर ठिय्या मांडला. त्यामुळे वाहतूक जवळपास दीड ते दोन तास कोलमडली. गंगाखेड येथेही महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे, मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी केदारखेडा ते भोकरदन असा भव्य ट्रॅक्टर मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आला. मोर्चामध्ये पाचशेवर ट्रॅक्टरसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : ढोलाच्या ठेक्यात पारंपरिक गजीनृत्य करत 'येळकोट येळकोट जय मल्हार', 'आरक्षण आमच्या हक्काचं…..', 'कोण म्हणतो देत नाय, घेतल्याशिवाय र्हात नाय' अशा गगनभेदी घोषणांच्या निनादात खंडाळ्यात धनगर समाज बांधवांनी महामार्ग रोखला. मेंढ्या आणि खेचरांसह महामार्गावर ठिय्या मांडल्याने तब्बल दोन तास वाहतूक कोलमडली.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारला. त्यानुसार बुधवारी महामार्गावर राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन केले.
खंडाळ्यातील शिवाजी चौकात सर्व समाज बांधव एकत्र आले होते. तेथून मोर्चाला प्रारंभ झाला. शेकडोंच्या संख्येने धनगर बांधव या मोर्चात सहभागी झाले. यावेळी घोड्यांवर संसार लादून मेंढ्यासह महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. खंडाळा पंचायत समितीच्या आवारात समाज बांधवांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाजारपेठेतून महामार्गावर मोर्चा पोहोचला. दुपारी 12.35 वाजता महामार्गाच्या दोन्ही लेनवर आंदोलकांनी मेंढ्या व घोड्यांसह ठिय्या मांडला. धनगर बांधवांनी महामार्गावरच ठिय्या टाकल्याने रस्त्यावरून जाणार्या वाहनांची भंबेरी उडाली. गर्दी वाढत जाईल, तसा रस्ता ब्लॉक झाला. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भोकरदन ; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी (दि. 20) केदारखेडा ते भोकरदन असा भव्य ट्रॅक्टर मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आला. मोर्चामध्ये पाचशेंवर ट्रॅक्टरसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलनांमधून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होत आहे. बुधवारी भोकरदन तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढत तत्काळ आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली. या मोर्चात मोठ्या संख्येने ट्रॅक्टरवर मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीने साखळी धरणे आंदोलनास शनिवारपासून भोकरदन उपविभागीय कार्यालयासमोर प्रारंभ झाला. त्यात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे. शासनास जरांगे-पाटील यांनी दिलेल्या 40 दिवसांच्या मुदतीपर्यंत सर्वांनी आपापल्या गावांत, तालुक्यांत शांततेत साखळी धरणे आंदोलन चालू ठेवावे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहे. त्यानुसार भोकरदन येथे साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील धनगर समाज बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गंगाखेड येथील समाजाचे नेते सुरेशदादा बंडगर यांच्यासह आप्पासाहेब रूपनर व बाळासाहेब दोडतले हे चौंडी येथे गेल्या 15 दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत. या उपोषणाच्या समर्थनार्थ बुधवारी (दि. 20) सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर महाराणा प्रताप चौकात (परळी नाका) दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
चंद्रपूर : मराठा समाजाला सरसकट ओबीसींमध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीसाठी येथे गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या समर्थनार्थ बुधवारी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाकडून गांधी चौकात शासन निर्णयाची होळी करण्यात आली. दरम्यान, ओबीसी युवक गुरूवारी आंदोलनस्थळी सामूहिक मुंडण करणार आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे या मागणीच्या विरोधात टोंगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. ओबीसींमध्ये मराठा समाजाला समाविष्ट केले तर ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यामुळे लढा देण्याची वेळ आली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.