चंद्रपूर

Tadoba Tiger Reserve | ताडोबात बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात वन्यप्राणी गणना; 168 मचाणीवरून थरारक निसर्गानुभव

बफरमध्ये 69 तर कोअरमध्ये 99 मचाणी, 210 पर्यटकांसह 200 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या चांदण्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे वन्यप्राणी गणनेचा अनोखा उपक्रम उद्या शुक्रवारी (1 मे) पार पडणार आहे. बफर आणि कोअर झोनमध्ये एकूण 168 मचाणी उभारून तब्बल 12 तास चालणाऱ्या या प्रगणनेत 210 पर्यटकांसह 200 पेक्षा अधिक वनाधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. निसर्गानुभव आणि वन्यजीवांविषयी जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष मानला जात आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण तेजाने झळकत असल्याने जंगलात लख्ख प्रकाश पडतो. या प्रकाशात वन्यप्राण्यांच्या हालचाली स्पष्ट दिसतात, त्यामुळे त्यांचे निरीक्षण आणि नोंद करणे सुलभ होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई असल्याने वन्यप्राणी प्रामुख्याने पाणवठ्यांच्या आसपास येतात. याच कारणामुळे अनेक वर्षांपासून या दिवशी वन्यप्राणी गणना करण्याची परंपरा कायम आहे.

यंदा या गणनेकरिता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये 69 मचाणी उभारण्यात आल्या असून येथे 210 पर्यटनप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. प्रत्येक मचाणीवर दोन पर्यटक आणि एक मार्गदर्शक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बफर झोन मधील मोहर्ली, मुल, चंद्रपूर, शिवणी, पळसगाव आणि खडसंगी या सहा वनपरिक्षेत्रांत ही प्रगणना पार पडणार आहे. वनविभागाकडून आवश्यक साहित्य आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दुसरीकडे, कोअर झोन हा अतिसंवेदनशील भाग असल्याने येथे पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. या भागात वनविभागाचेच अधिकारी आणि कर्मचारी प्रगणना करणार असून ताडोबाच्या कोअर झोन मधील मोहरली, ताडोबा, कोळसा, कोलारा आणि कारवा या पाच वनपरिक्षेत्रात 99 मचाणी उभारण्यात आल्या आहेत. 200 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी या निसर्ग अनुभव प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची ही संपूर्ण गणना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता सुरू होऊन शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत अखंडितपणे चालणार आहे. म्हणजेच तब्बल 12 तास जंगलात मचाणीवर बसून निरीक्षण करावे लागणार आहे. या काळात सहभागी पर्यटकांना त्यांच्या संबंधित मचाणीपर्यंत वनविभागाच्या माध्यमातून सुरक्षितपणे पोहोचविण्यात येणार आहे.

वन्यप्राणी गणना ही केवळ आकडेवारी जाहीर करण्यासाठी नसून डेटा संकलनासाठी केली जाते. या माध्यमातून जंगलातील प्राण्यांच्या सवयी, हालचाली आणि उपस्थिती यांचा अभ्यास केला जातो. तसेच, निसर्गप्रेमींमध्ये वन्यजीवांविषयी आत्मीयता आणि जागरूकता निर्माण करण्याचा हा मुख्य उद्देश आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून कडक उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात पाणवठ्यांकडे वळतात. त्यामुळे मचाणीवरून बसून चंद्रप्रकाशात त्यांचे निरीक्षण करणे हा सहभागींसाठी अत्यंत थरारक आणि अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या शांत, चांदण्यांनी उजळलेल्या रात्रीत जंगलातील जीवन अनुभवण्याची ही दुर्मीळ संधी असल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव संरक्षण आणि जनजागृतीच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

या उपक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून सहभागींच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. वनाधिकारी सतत उपस्थित राहून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
वनविभागाचे संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT