Tadoba-Andhari Tiger Reserve  
चंद्रपूर

Tadoba Tiger Reserve | ताडोबा सफारी बुकिंग पोर्टल हॅक झाल्याचा दावा खोटा;  ताडोबा व्यवस्थापनाची पोलिसांत तक्रार

सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टविरोधात कारवाईची मागणी : NIC च्या तपासात कोणतीही सुरक्षाभंगाची घटना नसल्याचे स्पष्ट

Namdev Gharal

चंद्रपूर :  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (TATR) ऑनलाइन सफारी बुकिंग प्रणालीमध्ये हॅकिंग झाल्याचा आणि मोठ्या प्रमाणात तिकिटांची अनधिकृत विक्री होत असल्याचा सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी यूट्यूबसह विविध सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये टाडोबाच्या ऑनलाइन बुकिंग पोर्टलमध्ये हॅकिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच सुमारे 80 टक्के सफारी तिकिटे एका अज्ञात व्यक्तीकडून अधिकृत व्यवस्थेबाहेर विकली जात असल्याचा दावा करण्यात आला होता.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रातील पर्यटनासाठी आरक्षण करण्यासाठी mytadoba.mahaforest.gov.in हे अधिकृत ऑनलाइन पोर्टल वापरले जाते. या पोर्टलचे व्यवस्थापन आणि संचालन नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) मार्फत केले जाते. सोशल मीडियावरील आरोपांची गंभीर दखल घेत NIC कडून पोर्टलची सखोल तांत्रिक तपासणी करण्यात आली. या तपासात पोर्टलमध्ये कोणत्याही प्रकारचा सुरक्षाभंग, अनधिकृत प्रवेश अथवा बुकिंग प्रणालीमध्ये छेडछाड झाल्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

प्रभूनाथ शुक्ला यांनी सांगितले की, तांत्रिक तपासणीतील निष्कर्षांमुळे संबंधित आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची प्रतिमा आणि ऑनलाइन बुकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी करण्याच्या उद्देशाने हे आरोप करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या दाव्यांमुळे पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता TATR प्रशासनाने संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, प्रकरणाच्या तपासानुसार पुढील माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT