Tiger vs Bear  
चंद्रपूर

Tiger vs Bear | थरार ताडोबाचा! दोन चवताळलेल्या अस्वलांसमोर जंगलाचा राजा झाला हतबल, घटनेचा video viral

वाघावरच ओढावली पळायची वेळ! मोहुर्ली रोडवरील थरारक घटना

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाची दहशत सर्वत्र असते. वाघ दिसताच इतर वन्यप्राणी जीव वाचवण्यासाठी पळ काढतात, हे नेहमीच पाहायला मिळते. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका थरारक व्हिडिओमध्ये चक्क दोन अस्वलांनी वाघालाच पळवून लावल्याची घटना समोर आली आहे.

ही रोमांचक घटना ताडोबातील मोहुर्ली रोड परिसरात घडली. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या वाहनांसमोर अचानक दोन अस्वले आणि एक वाघ समोरासमोर आले. सुरुवातीला वाघ दबक्या पावलांनी पुढे सरकत असल्याचे दिसत होते. मात्र काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. दोन चवताळलेल्या अस्वलांनी जोरदार डरकाळ्या फोडत थेट वाघाच्या दिशेने धाव घेतली.

अस्वलांचा आक्रमक अवतार पाहून काही क्षणांसाठी जंगलाच्या राजाचीही भंबेरी उडाली. वाघाने प्रतिकार करण्याऐवजी थेट पळ काढल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अस्वले सातत्याने त्याचा पाठलाग करत राहिली आणि अखेर वाघाला जीवाच्या आकांताने जंगलाच्या दिशेने धूम ठोकावी लागली.

वन्यजीव अभ्यासकांच्या मते, अस्वल हे स्वभावाने अत्यंत आक्रमक आणि अनपेक्षित हालचाली करणारे प्राणी मानले जातात. विशेषतः आपल्या पिल्लांचे रक्षण करताना किंवा धोका जाणवल्यास अस्वल कोणत्याही शिकाऱ्यावर हल्ला चढवू शकतात. त्यामुळे वाघासारख्या बलाढ्य शिकाऱ्यालाही काही वेळा माघार घ्यावी लागते.

दरम्यान, ताडोबातील हा थरारक प्रसंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. “जंगलात नेहमीच वाघाचाच दबदबा असतो” ही समजूत या घटनेमुळे काही काळासाठी तरी खोटी ठरल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT