Tadoba Tiger Reserve: ताडोबा बफरमध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू Pudhari
चंद्रपूर

Tadoba Tiger Reserve: ताडोबा बफरमध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू

शिवनी वनपरिक्षेत्रातील घटना; दोन वाघांतील झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागात पुन्हा एकदा वन्यजीवांमधील आंतरसंघर्षाची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शिवनी वनपरिक्षेत्रात एका अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याने वनविभागात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात हा मृत्यू दोन वाघांमधील झुंजीत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील शिवनी वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक ८४२ (नियतक्षेत्र शिवनी) येथे अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदम यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच बफर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. डुबे, एनटीसीएचे प्रतिनिधी बंडू धोत्रे, तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. विलास गावखरे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, मुल), डॉ. बजरंग सवारे (पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही) आणि डॉ. कुंदन पोडचेलवार (पशु वैद्यकीय अधिकारी, टीटीसी) उपस्थित होते. घटनास्थळाच्या पाहणीत मृत वाघाच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या असून, मागील भाग काही प्रमाणात खाल्लेला असल्याचे निदर्शनास आले. या निरीक्षणांवरून सदर अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू दोन वाघांमधील झुंजीत झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.

यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) यांच्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) पुढील प्रक्रिया पूर्ण करून मृत वाघाच्या देहाचे विधीपूर्वक दहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT