Sushama Amdhare vs Prtibha Dhanorkar 
चंद्रपूर

Sushama Andhare vs Pratibha Dhanorkar | सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावरून चंद्रपुरात राजकीय वाद पेटला!

‘लोकसभेत नाकेबंदी करू‘’ या इशाऱ्यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रत्युत्तर

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “महानगरपालिकेत आमच्या पक्षाची नाकेबंदी करणाऱ्यांची लोकसभेत नाकेबंदी करू,” असा इशारा अंधारे यांनी दिला होता. या वक्तव्यावर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अंधारे यांच्यावर टीका केली आहे.

खासदार धानोरकर म्हणाल्या की, काहीही वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे करत असतात. चंद्रपूरमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. “चंद्रपूरमध्ये शिवसेना भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापनेत सहभागी झाली, तेव्हा अंधारे कुठे होत्या?” असा सवाल त्यांनी केला.

लोकसभेच्या निवडणुकीत आपली नाकेबंदी करण्याची घोषणा अंधारे यांनी केली असल्यास त्याचे स्वागतच आहे, असे म्हणत धानोरकर यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. “अंतिम निर्णय हा मतदारच देणार आहेत. लोकशाहीत जनतेचा कौल सर्वात महत्त्वाचा असतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही मतभेद उघडपणे समोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. अंधारे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे चंद्रपूरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT