चंद्रपूर: पाऊस ओसरताच चंद्रपूर-मुल महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवले गेले नाहीत, तर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना स्पष्ट आदेश दिले.
रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठे संकट निर्माण करतात. अपघातांचा धोका वाढतो. “प्रत्येक नागरिकाचा जीव सुरक्षित राहावा, हीच माझी खरी जबाबदारी आहे. खड्डे बुजवण्यास कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही,” असा ठाम निर्धार आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चंद्रपूर-मुल महामार्ग पूर्णपणे सिमेंट काँक्रिटचा करण्याबाबतचे निवेदन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नुकतेच आमदार मुनगंटीवार यांनी दिले आहे. सकारात्मक प्रतिसाद देत गडकरी यांनी संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय होणार असल्याचे आश्वासन दिले. यासोबतच या मार्गावर वाहतुकीसाठी आवश्यक असलेला रेल्वे ओव्हरब्रिजलाही मान्यता मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
खड्ड्यांमुळे होणारे अपघात, जीवितहानी व वाहनांचे नुकसान या समस्या दूर करण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे तात्काळ उपाययोजना होणार आहेत. येत्या काही महिन्यांत सिमेंट काँक्रिट रस्ता व रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू झाल्यास चंद्रपूर-मुल महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळ टिकणारी सुरक्षितता व सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे. मात्र मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याने प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकारी कसा प्रतिसादर देतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.