चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीसाठी आज रविवारी (दि. २१ डिसेंबर) रोजी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने अभूतपूर्व यश संपादन करत भाजप व महायुतीचा धुव्वा उडवला आहे. ११ पैकी तब्बल ७ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भाजपला केवळ दोन ठिकाणीच यश मिळवता आले असून एका ठिकाणी अपक्ष तर एका ठिकाणी शिवसेना (शिंदे गट)चा उमेदवार विजयी झाला आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री तथा चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत स्पष्ट आणि आत्मपरीक्षणात्मक भूमिका मांडली आहे. “काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, मात्र आमच्या नेत्यांनी माझी शक्ती कमी केली,” असे सांगत त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले मुनगंटीवार म्हणाले की, “या जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण निर्माण झाले. हे आमच्या पक्षाच्या धोरणात आणि कार्यपद्धतीत दिसून आले. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीत आम्हाला पराभव स्वीकारावा लागला.”
भाजपच्या संघटनात्मक रचनेवर भाष्य करताना ते म्हणाले, “आम्ही जिल्ह्यात जे सूत्र अवलंबले ते शनिशिंगणापूरसारखे आहे. भाजप हा जिल्ह्यातील एकमेव असा पक्ष आहे ज्याला दरवाजे नाहीत. कोणीही केव्हाही येतो आणि त्याला पक्षात सामावून घेतले जाते. या गोष्टीचा परिणाम मतदारांवर नक्कीच होतो. याचे मूल्यांकन आम्ही भविष्यात नक्कीच करू.”
मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाच्या मुद्द्यावरही स्पष्ट भूमिका मांडली. “काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे आणले. भाजपने मला मंत्रीपद दिलेच नाही, उलट गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांपैकी कोणालाही मंत्रीपद मिळाले नाही,” असे सांगत त्यांनी पक्षांतर्गत नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली.
पराभवाबाबत संयमी भूमिका घेत मुनगंटीवार म्हणाले, “विजय झाला तर मिरवायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही. मतदारांनी कौल दिला आहे, तो आम्ही मान्य करतो. ज्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद मिळाला नाही, तिथेही आम्ही सेवा करत राहू.”
“जर काँग्रेसचे लोक अधिक विकास करू शकत असतील आणि जनतेचे प्रश्न सोडवू शकत असतील, तर त्याचे निश्चितच स्वागत केले पाहिजे. आम्ही निवडणूक पदासाठी लढत नाही, तर जनतेच्या हितासाठी लढतो. एकूणच या निवडणूक निकालामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडून आला आहे. काँग्रेसच्या यशामुळे पक्षाचे मनोबल उंचावले असून भाजपसमोर आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेमुळे भाजपच्या भविष्यातील संघटनात्मक बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.