चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेत यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले, तरी महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होईल, असा ठाम आणि खळबळजनक दावा भाजप नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. मागील निवडणुकीत 36 नगरसेवकांसह भाजपची निर्विवाद सत्ता असताना, यावेळी केवळ 24 नगरसेवक निवडून आले असतानाही सत्ता स्थापनेचा भाजपला विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मागीलवेळी चंद्रपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची स्पष्ट बहुमताची सत्ता होती. त्या वेळी भाजपचे तब्बल 36 नगरसेवक निवडून आले होते आणि कोणत्याही अडथळ्याविना सत्ता स्थापन झाली होती. मात्र, यावेळच्या निवडणुकीत चित्र काहीसे बदलले असून काँग्रेसचे 27, तर भाजपचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळ पाहता काँग्रेस आघाडीवर असली, तरी सत्ता स्थापनेची संधी भाजपलाच आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
मुनगंटीवार म्हणाले, “यावेळी निवडणूक काट्याची झाली आहे. जरी आमचे 24 नगरसेवक निवडून आले असले तरी महापौर बनवण्याची संधी आम्हालाच आहे. तसे स्पष्ट संकेत आम्हाला मिळत आहेत.” त्यांच्या मते, चंद्रपूर शहराच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून इतर पक्षांचे व अपक्ष नगरसेवक भाजपसोबत जाण्यास इच्छुक आहेत. “नगरसेवकांना आपल्या-आपल्या वार्डातील विकासासाठी उत्तर द्यावे लागते. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे विकासासाठी अधिक निधी आणता येऊ शकतो, याची जाणीव त्यांना आहे,” असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
सध्या महानगरपालिकेतील राजकीय गणित पाहता काँग्रेससोबत युती न झालेला प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) असून त्यांचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. याशिवाय 2 अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे 2, बहुजन समाज पार्टीचा 1 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.
“अपक्ष आणि काँग्रेसविरोधात निवडणूक लढवलेले काही नगरसेवक आमच्याशी चर्चा करत आहेत. ते भाजपसोबत येण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. आम्हाला सध्या सुमारे दहा नगरसेवकांची कमतरता आहे, पण ती भरून निघेल आणि आमचाच महापौर बसेल,” असा ठाम विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
‘हा मोदी ब्रँडचा विजय’
दरम्यान, निकालावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार यांनी हा विजय ‘मोदी ब्रँडचा’ असल्याचे सांगत ठाकरे ब्रँडला अप्रत्यक्ष टोला हाणला. “मोदी ब्रँडवर जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच विश्वासातून राज्यात भाजपला मोठे यश मिळाले. देशभर पक्षाची ताकद वाढते आहे. याच विश्वासातून मुंबई जिंकलो आणि ते मुंबईसह राज्याच्या विकासासाठी उत्तम ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.