चंद्रपूर: "माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघात तब्बल २० हजार बोगस मतांची नोंद करून भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यात आले," असा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी बोलताना धोटे यांनी सांगितले की, “माझ्या मतदारसंघात २० हजार बोगस मते वाढवण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर केवळ ६,७०० मते कमी झाली, तर उर्वरित १३ हजार बोगस मतांच्या जोरावरच भाजपचा उमेदवार विजयी झाला.” या मतांची नोंदणी ऑनलाइन झाल्याचे सांगण्यात आले असून, तहसीलदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
हा प्रकार केवळ राजुरापुरता मर्यादित नसून संपूर्ण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ५७ हजार बोगस मते वाढवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, “राहुल गांधी लोकशाहीच्या गळचेपीबद्दल जे बोलत आहेत, ते या बोगस मतांच्या प्रकारामुळे खरे ठरत आहे.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारयाद्यांची पडताळणी करतील आणि अशा बोगसगिरीला थारा देणार नाहीत, असा संकल्पही धोटे यांनी व्यक्त केला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात धोटे यांनी केलेल्या आरोपांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवल्याने आणि भाजपला लक्ष्य केल्याने आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.