Daga Hospital Stolen Baby Found
चंद्रपूर : डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयातून अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालिकेला लसीकरणाच्या बहाण्याने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. घटनेची माहिती मिळताच तहसील आणि यशोधरानगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच यशोधरानगर येथील टिपू सुल्तान चौक परिसरातून बालिकेची सुखरूप सुटका केली. बालिकेला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोळीबार चौक परिसरातील रहिवासी प्रभा शक्ती पाठराबे यांनी २० ऑगस्ट रोजी बालिकेला जन्म दिला होता. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवजात बालिका तिची आजी मीना खळतकर यांच्याजवळ होती. त्यावेळी बुरखा परिधान केलेली एक महिला तेथे आली. बालिकेला लसीकरणासाठी घेऊन जात असल्याचे सांगून तिने कुटुंबीयांची दिशाभूल केली. तसेच सरकारी योजनेअंतर्गत अर्ज केल्यास पैसे आणि साहित्य मिळेल, असे आमिषही दाखविल्याची माहिती आहे.
महिला बालिकेला घेऊन गेल्यानंतर बराच वेळ उलटूनही परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली. मात्र, रुग्णालयात अशा प्रकारचे कोणतेही लसीकरण सुरू नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने तहसील पोलिसांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे संशयित महिलेच्या हालचालींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान तिचे ठिकाण यशोधरानगर येथील टिपू सुल्तान चौक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर तहसील आणि यशोधरानगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तेथे कारवाई करून आशियाना अंजुम सैयद अल्ताफ हिला ताब्यात घेतले. तिचा भाऊ मोहम्मद शोएब यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी बालिकेला सुरक्षितपणे ताब्यात घेतल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करून आईच्या स्वाधीन केले. दरम्यान, संशयित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित महिलेच्या मुलीचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवजात बालिकेला रुग्णालयातून घेऊन जाण्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणामागील संपूर्ण सत्य तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.