चंद्रपूर : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर कार्यरत जिल्हा सल्लागार व गट समन्वयक, समूह समन्वयक (गट संसाधन केंद्र) कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आले नाही. ऐन तोंडावर असलेला दिवाळी सण अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांना भेटून मानधनाकरिता साकडे घातले आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषद येथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व पंचायत समिती स्तरावर गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कार्यरत आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर सल्लागार तर तालुकास्तरावर गट संसाधन केंद्रामध्ये गट व समूह समन्वयक कार्यरत आहेत. हे कर्मचारी जल जीवन मिशनचे काम सांभाळून अतिरिक्त स्वच्छ भारत मिशनचे काम सांभाळीत आहेत. दोन्ही कार्यक्रम राज्य व केंद्राचे महत्त्वकांक्षी प्रकल्प आहेत. सर्व कर्मचारी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांचे मानधन मागील जुलै 2025 पासून रखडलेले आहेत. चार महिन्यापासून राज्याने मानधन अदा न केल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. गणेश चतुर्थी पूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्याचे शासनाचे निर्देश होते परंतु, त्याहीवेळी या कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्यात आले नाही. त्यानंतर दसरा गेला आणि आता दिवाळी ऐन तोंडावर आली असतानाही राज्याने अजून जिल्हास्तरावर मानधनाचा निधी अदा केलेला नाही. त्यामुळे दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
एकीकडे शासन दिवाळी आधी वेतन अदा करण्याचे निर्देश देते तर दुसरीकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे राज्यभरातील जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत असणारे जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत कर्मचारी मानधनापासून वंचित आहेत. राज्यस्तरावर निधी उपलब्ध नसल्याने मानधन अदा करण्यास अडचणीत असल्याचे राज्याचे म्हणणे आहे.
याबाबत राज्यस्तरावर वेळोवेळी मानधनाकरीता संपर्क साधण्यात आला. परंतु केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही म्हणून मानधन देणे शक्य नाही,” अशी मोघम उत्तरे दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीच्या संताप निर्माण झाला आहे.
याबाबत राज्यातील कर्मचाऱ्यांनी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दिवाळीपूर्वी मानधन अदा करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची मागणी राज्यस्तरावर पोहोचवली आहे. तसेच राज्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांचे एका शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन पाणी पुरवठ स्वच्छता विभागाचे प्रधान सचिवांची भेट घेऊन मानधन अदा करण्याकरिता साकडे घातले आहे. चार महिन्यापासून मानधन अदा करण्यात न आल्यामुळे परिवारावर कसे संकट ओढावले आहे, याचा पाढाच शिष्टमंडळाने प्रधान सचिवांसमोर वाचून दिवाळीपूर्वी मानधन अदा करण्यात यावे अशी मागणी केली.