Shivai AC Bus Air Conditioning Fails; Passengers Suffer in 45°C Heat, Raising Questions Over Corporation's Operations
चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
विदर्भात उष्णतेचा पारा 45 अंशांच्या पुढे पोहोचलेला असताना, चंद्रपूर ते नागपूर धावणाऱ्या शिवाई एसी बसमध्ये एसी बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एसी बसचे जास्तीचे भाडे भरूनही मूलभूत सुविधा न मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त करत महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चंद्रपूर ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या शिवाई एसी बस (क्र. MH 49 BZ 4654) मध्ये प्रवाशांना उष्णतेचा मोठा फटका बसला. प्रवासादरम्यान अचानक एसी यंत्रणा बंद पडल्याने बसमधील वातावरण अक्षरशः तापले. बाहेर 45 अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान आणि आत बंदिस्त बसमध्ये हवा खेळती नसल्यामुळे प्रवासी घामाघूम झाले.
एसी बस असल्यामुळे प्रवाशांनी अधिक भाडे मोजले होते. मात्र, एसीच बंद पडल्याने प्रवास अत्यंत त्रासदायक ठरला. काही प्रवाशांना चक्कर, अस्वस्थता जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागला.
या प्रकारामुळे संतप्त प्रवाशांनी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करून आपली नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होत असून, महामंडळाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र टीका होत आहे. नियमित देखभाल आणि तपासणी होत नसल्याचा आरोपही प्रवाशांकडून केला जात आहे.
दरम्यान, एवढ्या उष्णतेच्या काळात एसी बस सेवा सुरू ठेवताना तांत्रिक बाबींची काळजी घेणे आवश्यक असताना अशा घटना घडणे गंभीर मानले जात आहे. एसी बंद पडल्यावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, यामुळेही प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
या घटनेनंतर संबंधित बस डेपो आणि राज्य परिवहन महामंडळाने तात्काळ दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.