चंद्रपूर : वरोरा शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाकीशेजारी असलेली तब्बल ५४ वर्षे जुनी व जीर्ण झालेली पाण्याची टाकी अखेर नगरपरिषद प्रशासनाने हटवली. धोकादायक अवस्थेतील या टाकीमुळे नवीन टाकीसह परिसरातून ये-जा करणारे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आलेल्या पाडकामामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.
शासकीय रुग्णालय परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षकांची वर्दळ असते. याच मार्गालगत नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. मात्र, तिच्या अगदी शेजारी असलेली जुनी पाण्याची टाकी जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत पोहोचली होती. त्यामुळे जुन्या टाकीचा धोका नवीन टाकीला निर्माण होण्यासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगरसेविका रोशनी संदीप भडके यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. जुनी टाकी तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने पाडकामाची प्रक्रिया सुरू केली.
नवीन पाण्याच्या टाकीला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी तांत्रिक नियोजन करून गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेत जुन्या टाकीचे पाडकाम करण्यात आले. अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवाईत अखेर काल रात्री ५४ वर्षे जुनी धोकादायक पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्यात आली.
या कारवाईसाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी विशेष लक्ष दिले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि योग्य नियोजनामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.