चंद्रपूर : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शुक्रवारी (दि. २१) सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाला आणि सलग दोन दिवस ताडोबातील कोअर झोन मधील कोलारा गेटमधून घेतलेल्या सफारीत त्याने व्याघ्रदर्शनाचा आनंद घेतला. पत्नी अंजली आणि दोन मित्रांसह सचिन बांबू रिझॉर्ट येथे मुक्कामी होता.
शुक्रवारी ताडोबात दाखल झाल्यानंतर सचिनने दुपारी सफारी केली परंतु त्यावेळी एकही वाघाचे दर्शन झाले नाही. पुन्हा कोअर झोनमध्ये कोलारा गेट द्वारे दुसऱ्या दिवशी सकाळी (शनिवार) सफारी केली. यावेळी त्याला बिजली वाघिण आणि तिची जोडीदार बबली यांचे दर्शन झाले. जंगल सफारीत या दोन्ही वाघिणींचे दर्शन होणे दुर्मिळ मानले जाते. याच दिवशी सायंकाळच्या सफारीत सचिनला युवराज हा देखणा नर वाघ दिसला. मोठ्या शांतपणे चालत असलेल्या युवराजचे दर्शन सचिन ला घेता आले.
रविवारी सकाळच्या अंतिम सफारीत सचिनला पुन्हा एकदा कोलारा झोनमध्ये बिजलीच्या तीन बछड्यांचे दर्शन झाले. बिजलीचे हे लहान बछडे सध्या ताडोबातील मुख्य आकर्षण असून त्यांची हालचाल पाहणे पर्यटकांसाठी भाग्याचा क्षण मानला जातो. व्याघ्रदर्शन झाल्यानंतर सचिनच्या चेहऱ्यावर विशेष समाधान दिसत होते.
सचिन तेंडुलकर दरवर्षी ताडोबात मुक्काम करतो. छोटी तारा, बिजली, रोमा, मोगली, युवराज, बलराम यांचे दर्शन घ्यायला तो खास वेळ काढतो. यंदाचा दौरा त्यांच्यासाठी विशेष ठरला आहे कारण सलग तीन सफारीत त्यांना चार वेगवेगळ्या वाघांचे दर्शन झाले.
दोन दिवसांची सफारी पूर्ण केल्यानंतर आज दुपारी सचिन ताडोबातून नागपूरकडे स्वतः गाडी चालवत रवाना झाला. निरोप घेताना माध्यमांशी बोलताना सचिन म्हणाला, ‘या वेळची ताडोबा सफारी खूपच सुंदर झाली. बिजली, बबली, युवराज आणि बछड्यांचे दर्शन लाभल्यामुळे हा दौरा अविस्मरणीय ठरला.’ ताडोबातील दोन्ही दिवस सचिनसाठी अत्यंत सफल ठरले आणि उद्येश साध्य झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
ताडोबातील मुक्काम संपवून सचिन तेंडुलकर नागपूरकडे रवाना झाला आणि मार्गात कुही-मांढळजवळील गोठणगाव परिसरातही एक छोटी सफारी केली. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर सचिन नागपूरला पोहोचला आणि त्यानंतर मुंबईकडे प्रयाण केले.