चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिण्यापासून बेपत्ता असलेली ताडोबाची क्विन टि 12 माया वाघिणीचे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात आज शनिवारी गस्तीदरम्यान अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील चार महिण्यापासून टि 12 वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होणे बंद झाले होते. तेव्हापासून पर्यटक आणि वन्यप्रेमींमध्ये माया वाघिणीच्या अस्तित्वाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ह्या बाबतची ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ह्या विषयी अधिकृत माहिती दिली आहे.
T-12 ही वाघिणी ही माया नावाने ताडोबात सर्वपरिचीत होती. ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य पांढरपवणी भागातील प्रबळ वाघिण होती. तिचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये जन्म झाल्याची नोंद आहे. जून 2014 पासून टि 12 वाघिणीने पाच वेळा शावकांना जन्म दिला आहे. सन 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये एकूण 13 शावकांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता वाढण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. ह्यातील काही शावकांचा नैसर्गिक दृष्ट्या मृत्यू झाला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमीत होणा-या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातुन शास्त्रशुध्द पध्दतीने होणा-या संशोधनामध्ये 2014 पासून या वाघांची नियमीत नोंद होत होती. परंतु मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुरू असलेल्या फेस 4 मध्ये तीची शेवटची नोंद झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ताडोबा तलावाजवळील पंचामध्ये गस्त करीत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचा-यांना तिचे शेवटचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर ती पूर्वीच्या गृह क्षेत्रात दिसत नव्हती. तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच पर्यटकांमध्ये तिच्या मृत्यू बाबत शंका घेतली जात होती. ताडोबातील तिच्या सध्याच्या अस्तित्वाविषयी पर्यटन प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे ताडोबाच्या व्यवस्थापानाने वन विभागामार्फत तिच्या गृहक्षेत्रामध्ये आणि लगतच्या वन परिक्षेत्रामध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्त करून शोध मोहीम सुरु केली होती. तिच्या गृहक्षेत्र म्हणजेच ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचा-यानी पिंजून काढले होते. या संसोधन प्रक्रियेत T-07, T-114, T-115, T-158, T-16, T-120, T. 138, T- 164, T- 168, T-181 आणि T-100 असे एकूण 11 विविध वाघ त्यामध्ये 6 माद्या आणि 5 नर निरीक्षणामध्ये आढळून आले.
7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रियेमध्ये टि 12 (माया) वाघिणीचे अस्तीत्व आढळून आले नाही. त्यामुळे तिला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 16 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कौर क्षेत्रातील कार्यरत सर्व वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी वन्यजीव संशोधक, विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व कर्मचारी आणि रोजंदारी वनमजुर अशा सुामरे 150 वन कर्मचा-यांना 5 गटांमध्ये विभागून कौर क्षेत्रातील विविध ठिकाणी पायदळ गस्त करण्यात आली. यासोबतच कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा यांच्या सहायाने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनचे नेतृत्व ताडोबा-अंधारी व्याप प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांनी केले. ताडोबा अंधारी व्याध्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, कोर क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, जिवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर यांच्या उपस्थितीत सुरु होते.
आज (दि. १८, शनिवार) ताडोबा वनपरिक्षेतील ताडोबा नियतक्षेत्रातील (बीट) कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना काही अवशेष निदर्शनास आले अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश असल्याचे दिसून आले. ते सुमारे 100 चौ.मी. वनक्षेत्रात विखुरलेले होते. सर्व अवशेष एकत्र करण्यात आले. सदर अवशेष संसोधन आणि विश्लेषणासाठी पशुवैद्यकिय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञांद्वारे डिएन विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर अवशेष कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. पुढील शवविच्छेदन तपासणीसाठी अवशेष योग्य नव्हते. या क्षेत्रात आणि परिसरामध्ये कोणतेही मानवी हालचाल व कृती आढळून आली नाही. टि 12 माया वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाल वर्तविला आहे. गोळा केलेले काही नमुने तात्काळ नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCBS) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बंगलौर येथे विश्लेषणासाठी पाठविले जाणार आहेत. चालू असलेले वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीद्वारे T-12 वाघाच्या डीएनए नमुन्यांशी जुळले जाऊ शकतात आणि या संदर्भातील अहवाल 30 नोव्हेंबर 2023 प्राप्त होणार आहे. टि 12 वाघिणीच्या स्थितीबाबत अंतिम डीएनए विश्लेषण अहवालानंतर माया वाघिणीचे सत्य समोर येणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले आहे.