महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशातील सर्वात भ्रष्ट; काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांचा आरोप  file photo
चंद्रपूर

महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशातील सर्वात भ्रष्ट; काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांचा आरोप

मोहन कारंडे

चंद्रपूर : महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार देशात सर्वात भ्रष्ट आहे. या सरकारला जनाधार उरला नाही. त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यानंतर दिल्लीत केंद्रात सत्ता बदलाची प्रक्रिया सुरु होईल, असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि आढावा बैठक सोमवारी (२३ सप्टेंबर) ला चंद्रपुरात पार पडली. या मेळाव्याला चेन्नीथला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रशांत पडोळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, रामकिशन ओझा, शहर अध्यक्ष रामू तिवारी, नाना गावंडे आदी उपस्थित होते. राज्यातील सर्वच मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. मतदार महायुतीचे सरकार घालविण्यासाठी तयार आहेत. राज्यात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात आहेत. बेरोजगारीचा दर वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल. आमच्यात कोणतेही मतभेद नाही, असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही महायुती सरकारवर यावेळी टीकास्त्र सोडले. महायुती सरकारचे विकासाचे मॉडेल भ्रष्टाचारी आहे. राज्याचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याच्या कामातसुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार केला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन होईल, याबाबत शंका आहे. राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघाले आहे. मात्र, आम्ही सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. त्यात आणखी वाढ करू, असे पटोले यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT