Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Municipal Election Results | चंद्रपूर महापालिकेच्या माजी महापौरांचा पराभव, पतीचा विजय

भाजपच्या माजी महापौर राखी कंचर्लावार यांचा दारुण पराभव, पती संजय कंचर्लावार मात्र प्रभाग ११ मधून विजयी

पुढारी वृत्तसेवा

BJP Chandrapur News

चंद्रपूर : मागील कार्यकाळात पूर्ण भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत यावेळी भाजपला सत्ता कायम ठेवणे अवघड ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपच्या माजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांचा झालेला पराभव. विशेष म्हणजे निवडणुकीत पती-पत्नी दोघेही रिंगणात असताना पत्नीला पराभव पत्करावा लागला, तर पती संजय कंचर्लावार यांनी विजय मिळवला आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेवर मागील कार्यकाळात भाजपची संपूर्ण सत्ता होती. याच काळात राखी संजय कंचर्लावार यांनी महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मात्र यावेळी निवडणूक निकालांनी भाजपसमोरील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपसाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे माजी महापौर राखी कंचर्लावार यांचा झालेला पराभव होय.

राखी कंचर्लावार या प्रभाग क्रमांक 8-क  येथून उमेदवार होत्या. मात्र त्यांना या प्रभागात विजय मिळवता आला नाही. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या प्रतीक्षा अक्षय येरगुडे, या काँग्रेस युतीच्या उमेदवाराने राखी कंचर्लावार यांचा दारुण पराभव केला. माजी महापौरच पराभूत झाल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर आणि पक्षाच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे याच निवडणुकीत राखी कंचर्लावार यांचे पती संजय नारायण कंचर्लावार हेही उमेदवार होते. त्यांनी प्रभाग क्रमांक 11 भानापेठ येथून निवडणूक लढवली. संजय कंचर्लावार यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज विलासराव आईंचवार यांचा पराभव करत विजय मिळवला. संजय कंचर्लावार यांना 3685 मते मिळाली, तर पंकज आईंचवार यांना 3407 मते मिळाली.

पती-पत्नी दोघेही एकाच वेळी निवडणूक रिंगणात असताना पत्नीचा पराभव आणि पतीचा विजय, हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एकाच कुटुंबातील उमेदवारांना मतदारांनी वेगवेगळा कौल दिल्याने स्थानिक मुद्दे, उमेदवाराची प्रतिमा आणि प्रभागनिहाय समीकरणे किती निर्णायक ठरतात, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

एकूणच, माजी महापौरांचा पराभव, भाजपच्या काही प्रमुख नेत्यांचे अपयश आणि काँग्रेस-मित्रपक्षांची वाढती ताकद यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत यावेळी भाजपला सत्ता हस्तगत करणे कठीण होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT