Rajura Municipal Council Election Result 2025 
चंद्रपूर

Rajura Municipal Council Election Result 2025 | राजुरा नगरपरिषदेवर काँग्रेस-शेतकरी संघटनेची सत्ता

अरुण धोटे २७३३ मतांनी नगराध्यक्षपदी विजयी, भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट व महिला शहराध्यक्ष मायाताई धोटे पराभूत झाल्या

पुढारी वृत्तसेवा

  • अरूण धोटे हे नगर विकास आघाडीकडून दुस-यांदा तर एकूण चौथ्यांदा अध्यक्षपदावर विजयी झाले.

  • सिध्दार्थ पथाडे आणि गीताताई पथाडे हे पती - पत्नी निवडून आले.

  • जुबेर शेख यांनी विजयी होताच माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांची भेट घेऊन पाठिंबा

चंद्रपूर :  राजुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या नगर विकास आघाडीने स्पष्ट वर्चस्व मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा रोवला आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेस - शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राधेश्याम लक्ष्मीनारायण अडाणीया यांचा २७३३ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. अरुण धोटे यांना ९०११ मते मिळाली, तर राधेश्याम अडाणीया यांना ६२७८ मते मिळाली. तिसरे उमेदवार शिवसेना शिंदे गट यांना ६२१ मतांवर समाधान मानावे लागले.

   नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीतही बहुतांश प्रभागांत काँग्रेस - शेतकरी संघटना आघाडीने यश मिळवले. काँग्रेस व शेतकरी संघटना नगर विकास आघाडीचे १६ नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले तर भारतीय जनता पक्षाचे ४ उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक १० मध्ये नगर विकास आघाडीचे भारत रोहणे व अपक्ष जुबेर शेख या दोघांनाही ४०६ मते मिळाली. समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी झाली. त्यात जुबेर शेख विजयी झाले. निवडून येताच त्यांनी ॲड. वामनराव चटप यांची भेट घेऊन आपला पाठींबा घोषित केला.

   राजुरा नगर पालिकेत प्रभाग क्रमांक १ मध्ये स्वप्निल मोहुर्ले व मयुरी पानपट्टे विजयी झाले. प्रभाग क्रमांक २ मध्ये सिद्धार्थ पथाडे व मंगला मोकळे यांनी बाजी मारली. प्रभाग ३ मध्ये पौर्णिमा सोयाम व ईश्वर उर्फ गोलू ठाकरे यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नीता बानकर व अमोल चिल्लावार विजयी ठरले, तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये भूपेश मेश्राम व सैैय्यद फरीना शेख यांनी यश संपादन केले. प्रभाग ६ मध्ये इंदुताई निकोडे व रमेश नळे विजयी झाले. प्रभाग ७ मध्ये पूनम गिरसावळे आणि प्रफुल्ल कावळे यांनी विजय मिळवला. प्रभाग ८ मध्ये वज्रमाला बतकमवार व दिलीप डेरकर विजयी झाले. प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनंता ताजने, संध्या चांदेकर व अनु हरजितसिंग संधू यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १० मध्ये गीता पथाडे आणि जुबेर शेख विजयी झाले.

    या निकालानंतर शहरात काँग्रेस-शेतकरी संघटना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतदारांनी विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत कौल दिल्याचे मत व्यक्त केले जात आहे. नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांसमोर आता शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT