चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके  Pudhari
चंद्रपूर

Ashok Uike | आरोग्य केंद्रातून नागरिकांना उत्कृष्ट सेवा द्या : पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

पालकमंत्र्यांच्या हस्ते पाटाळा व डोंगरगाव येथील उपकेंद्राचे लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Healthcare Services

चंद्रपूर : आरोग्य ही नागरिकांची प्राथमिकता आहे. गावखेड्यातील गरीब नागरिक आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उपचारासाठी येत असतात. त्यांच्या आरोग्याची योग्यप्रकारे तपासणी करून त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध करून देणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाताळा (ता. भद्रावती) आणि डोंगरगाव (ता. वरोरा) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेल्या वास्तुचे आज लोकार्पण होत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याची काळजी, निगा आणि दक्षता घेणे आपले कर्तव्य आहे. केवळ आजारी पडल्यावरच नाही तर नियमितपणे आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पावसाळ्यात कोणकोणते आजार होऊ शकतात, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. आरोग्याची चळवळ निर्माण करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा. आपले गाव ‘आरोग्य संपन्न’ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

तसेच वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून लोकांच्या दारापर्यंत आपली सेवा द्यावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिले. सुरवातीला फित कापून उपकेंद्राचे लोकार्पण झाल्यावर त्यांनी नोंदणी कक्ष तथा प्रतिक्षालय, तपासणी कक्ष, महिला आंतररुग्ण कक्ष, औषध साठा गृह, प्रसुती कक्ष आदींची पाहणी केली.

82 लक्ष 52 हजार रुपये खर्च करून पाटाळा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराणा, कुचना, नागलोण, कावडी या गावातील जवळपास 5500 नागरिकांना 13 प्रकारच्या आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला पाताळाचे सरपंच विजेंद्र वानखेडे, भद्रावतीचे प्रभारी तहसीलदार मधूकर काळे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर आदी उपस्थित होते.

डोंगरगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 54 लक्ष 62 हजार रुपये खर्च करून बांधण्यात आले आहे. या उपकेंद्रांतर्गत डोंगरगाव, खापरी, टाकळी, निमसडा आदी गावातील 2700 नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ होणार आहे. कार्यक्रमाला वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, गटविकास अधिकारी श्री. शेंडे, माजी सरपंच इंदू खिरटकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT