चंद्रपूर : महानगरपालिकेतील महापौर निवडीभोवती सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. “जनतेने काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल दिला असतानाही महापौर आमचा होऊ शकला नाही. मात्र त्याचे संपूर्ण खापर माझ्या माथी फोडण्यात आले. या प्रक्रियेत खरे दोषी कोण आहेत, हे अजून जनतेसमोर आलेले नाही,” असे म्हणत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लवकरच गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.
खा. धानोरकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महापौरपद काँग्रेसकडे न गेल्याबाबत माध्यमांमधून आणि राजकीय पातळीवर त्यांना जबाबदार धरले जात आहे. “संपूर्ण घटनाक्रमात अनेक पातळ्यांवर चर्चा आणि हालचाली झाल्या. मात्र एकतर्फी पद्धतीने मला दोषी ठरवण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप त्यांनी केला.
‘जनतेने दिला कौल, पण सत्ता हुकली’
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे महापौर काँग्रेसचाच होईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये होती. मात्र अंतिम टप्प्यातील सत्तासमीकरणे बदलल्याने महापौरपद काँग्रेसच्या हातातून निसटले. या पार्श्वभूमीवर आता अंतर्गत मतभेद आणि जबाबदारीच्या मुद्द्यावरून वाद अधिक तीव्र होताना दिसत आहेत.
लवकरच करणार खुलासा
“आता मी संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहे. या सर्व प्रक्रियेत खरे दोषी कोण, कोणत्या पातळीवर निर्णय चुकले, आणि काय घडले, याचा सविस्तर खुलासा करणार आहे,” असे स्पष्ट करत खा. धानोरकर यांनी गौप्यस्फोटाचा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळात उत्सुकता
खा. धानोरकर यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटात कोणत्या नेत्यांची नावे पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील सत्तानाट्यानंतर आता काँग्रेसमध्येही अंतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.