Chandrapur Mineral Reserves
चंद्रपूर : काळ्या सोन्याचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रपूरमध्ये प्लॅटिनम आणि क्रोमियम धातूचे साठे आढळून आले आहेत. हे सर्वेक्षण मिनरल एक्सप्लोरेशन कोर्पोरेशन लिमिटेड (mecl) कंपनीने जिल्ह्यात सावली तालुक्यातील सावली व पाथरी नावाने ओळखले जाणाऱ्या ब्लॉकमध्ये केले आहे. या बाबतचा अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. सदर अहवाल पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांना प्राप्त झाला असून त्या आधारे त्यांनी सावली व पाथरी परिसरात सर्वे झालेल्या ठिकाणी पहाणी केली.
काळ्या सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे मौल्यवान खनिजे धातू आढळून येत आहेत. त्यामुळे चंद्रपूरची ओळख देशभरात झाली आहे. काळ्या सोन्यानंतर प्लॅटिनम, क्रोमियम खनिज धातूसाठी आता चंद्रपूरची ओळख होणार आहे. जिल्ह्यातील सावली तालुक्यात प्लॅटिनम, क्रोमियम आणि अल्प प्रमाणात सोने ह्या मौल्यवान धातुंचे साठे आढळून आले आहेत. सावली-पाथरी नावाने ओळखला जाणारा ह्या ब्लॉकला सर्वेक्षण करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ माईन तर्फे मान्यता देण्यात आली होती. डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. या परिसरात १६० वर्ग किमी ऐवढ्या भूभागाचे G-4 पद्धतीचे टोपोग्राफीकल सर्वेक्षण पार पडले.
मिनरल एस्कप्लोरेशन कोर्पोरेशन लिमिटेड (MECL) या कंपनीला हे सर्वेक्षण देण्यात आले. यामध्ये भूपृष्टावरील खडक आणि मातीचे नमुने गोळा करण्यात आले. ते नमुने नागपूर आणि कानपूर येथील प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात आली. विशेष म्हणजे या ब्लॉकमध्ये घनदाट जंगल आणि वन्यजीव असल्याने सर्वेक्षण चमूला पूर्ण भागाचे नमुने गोळा करता आले.
मिनरल एस्कप्लोरेशन कोर्पोरेशन लिमिटेड तर्फे एक प्राथमिक सविस्तर अहवाल प्रसिद्ध करून शासनाला २०१८ मध्ये सादर करण्यात आला. सदर अहवाल भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांना प्राप्त झाला असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी २१ एप्रिल २०२५ रोजी सावली तालुक्यातील सावली पाथरी ब्लॉकला भेट देऊन पहाणी केली. या ब्लॉकमध्ये सावली तालुक्यातील बारा गावांचा समोवश आहे. भौगोलिक दृष्ट्या सावली-पाथरी भूभाग हा बस्तर क्रेटोनचा भूभाग आहे. येथे ३०० कोटी वर्षादरम्यानचे आर्कीयन काळातील आणि १५० कोटी वर्षापूर्वीच्या प्रोटेरोझोईक काळातील खडक आहेत.
प्राथमिक सर्वेक्षणात प्लॅटिनम, क्रोमियम साठे आढळले आहेत. देशात मौल्यवान असलेले धातू चंद्रपूर जिल्ह्यात आढळल्याने त्यांचा फायदा जिल्ह्याच्या विकासाठी होऊ शकतो. याकरीता शासनाने सविस्तर सर्वे करण्याची गरज आहे. भविष्यात भूगर्भीय सर्वेक्षण झाल्यास धातूंची अचूक माहिती समोर येईल. याकरीता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रिया पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.