चंद्रपूर : बार मध्ये मालकासोबत बिल देण्यावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दिलीप चव्हाण नामक पोलिस शिपायाची गुंड प्रवृत्तीच्या एका व्यक्तीने हत्या केली. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना 7 मार्च रोजी पठाणपुरा गेट बाहेरील पिंक पॅराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरंट मध्ये घडली होती. या घटनेनंतर आज पोलिस प्रशासनाने पिंक पॅराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरंट सिलबंद करण्याची कार्यवाही केली.
7 मार्च रोजी पठाणपुरा गेट बाहेरील पिंक पॅराडाईज बार मध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते. त्यावेळी गुंड प्रवृत्तीच्या युवकाने बार मालकाशी बिल देण्यावरून भांडण सुरू केले. भांडण वाढल्याने त्याचे रूपांतर मारहाणीत झाले, त्यानंतर त्या युवकाने काही जणांना सोबत घेऊन पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण व समीर चाफले यांचेवर सपासप वार केले. या भ्याड हल्ल्यात पोलीस दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी समीर चाफले हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर शहर पोलिसांची या बारकडे नजर होती.
लोकहिताच्या दृष्टीने आज 11 मार्चला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंक पॅराडाईज बार अॅण्ड रेस्टॉरंट पोलीस स्टॉफच्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके, पो.स्टे. चंद्रपूर शहर व पोलीस स्टॉफ यांनी केली आहे.