चंद्रपूर : चंद्रपूर लगतच्या घुग्घूस शहरात लिजेंड लिग क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन पध्दतीने जुगार लावणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ३ लाखाच्या रोख रक्कमेसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली. अंशुल रामबाबु रॉय असे संशयित आरोपीचे नाव आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज सोमवारी करण्यात आली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी लिजेंड लिग भारत विरूध्द वेस्ट इंडिज विरूध्द क्रिकेट सामना होता. याच सामन्यावर ऑनलाईन पध्दतीने घुग्घूस शहरात एकजण आपल्या घरात जुगार खेळत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने घुग्घूस शहरात अंशुल रामबाबु रॉय याच्या घरात छापा टाकला. तो घरात मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरू असलेल्या लिजेंड लिग भारत विरूदध वेस्टइंडीज या क्रिकेट मॅचवर सट्टा (क्रिकेट बेटींग) घेत असल्याचे आढळून आले. आरोपी अंशुल रॉय याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३ लाख रुपये मिळून आले. तसेच १ लाख रूपये किंमतीचा अॅपल कंपनीचा एक मोबाईल व ३८ लाख रूपयांची ऑनलाईन जुगार आय.डी. असा एकूण ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याविरूद्धात घुग्घुस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलिस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शंशाक बदामवार, अमोल सावे, मिलींद टेकाम यांनी केली.