चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चिमूर शहरातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी चिमुर येथील मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे. या बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना आज शनिवारी एका लेखी निवेदनद्वारे मागणी केली. (Chandrapur Crime News)
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर शहरातील दोन अल्पवयीन मुलींवर खाऊ देण्याचे आमीष दाखवून येथीलच आरोपी नसिर वजीर शेख (वय 48) रसिद रूस्तम शेख (वय 58) यांनी अत्याचार केला. 14 एप्रिल ला अत्याचाराची घटना उघडकीस आली. त्यानंतर पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून चिमुर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींवर बलात्कार व पौक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे चिमुरात प्रचंड आक्रोश व्यक्त करीत या घटनेचा निषेध करण्यात आला. जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींवर कठोर कारवाई मागणी लावून धरण्यात आली. दोन्ही आरोपींवर कलम 64, 64 (2) (एम), 65 (1) 65(2) सहकलम 4,8 अन्वये पौक्सो कायद्याखाली अटक केली करण्यात आली. वरोरा येथील सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावून तुरूंगात रवाणगी करण्यात आली आहे.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने क्रांतीकारी चिमुर शहर हादरून गेला आहे. येथील विविध संघटनांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध करीत दोन्ही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आज शनिवारी चिमुर येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना भेटून दोन्ही आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहम्मद आरिफ शेख, इमरान कुरेशी, कलीम शेख, रिजवान पठाण, अफरोज पठाण, जमीर शेख, रहीम शेख, अनिस शेख,अएफाज शेख आदींची उपस्थिती होती.