चंद्रपूर : लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदारयादी अचूक असणे अत्यंत आवश्यक असून मतदान प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. चंद्रपूर शहरात त्यांनी सपत्नीक मतदान करत मतदारयादीतील त्रुटींवर चिंता व्यक्त केली.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार उपस्थित होत्या. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी मतदारयादीतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला.
ते म्हणाले की, निवडणूक आयोग या संपूर्ण प्रक्रियेवर साडेपाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करतो. मात्र तरीही अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात, ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे. मतदारयाद्या वेळोवेळी दुरुस्त होणे आणि त्या अचूक असणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान अनिवार्य करण्याबाबत कायदा करता येईल का, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व स्तरांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.