Monsoon Session 2026 
चंद्रपूर

Monsoon Session 2026 : निकृष्ट कोळशामुळे राज्यातील वीज निर्मितीवर परिणाम; पुरवठादारांना ब्लॅकलिस्ट करा : विजय वडेट्टीवार

निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीसांनीही केली मान्य

पुढारी वृत्तसेवा

Monsoon Session 2026

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर वीज निर्मिती केंद्रांमधील तांत्रिक बिघाड आणि संच बंद पडण्याच्या घटनांवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याचा गंभीर आरोप केला. यासोबतच अशा पुरवठादारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याला निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरविला जात असल्याची बाब मान्य केली.

वीज निर्मिती संचांमध्‍ये तांत्रिक बिघाडाकडे वडेट्टीवारांनी वेधले लक्ष

राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात वीजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. या काळात महाजनिर्मितीच्या अनेक वीज निर्मिती संचांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या. या मुद्द्यावर विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचे लक्ष वेधले.

तांत्रिक अडचणींच्या मागे निकृष्ट दर्जाचा कोळसा

सभागृहात बोलताना वडेट्टीवार म्‍हणाले की, राज्यातील अनेक वीज निर्मिती केंद्रांतील संच वारंवार बंद पडत आहेत. या तांत्रिक अडचणींच्या मागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हे प्रमुख कारण असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे सांगत त्यांनी निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली.

कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याची वस्‍तुस्‍थिती : मुख्‍यमंत्री फडणवीस

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला पुरविला जाणारा काही कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती मान्य केली. कोळसा पुरवठ्याबाबत केंद्रीय कोळसा मंत्र्यांसोबत बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोळशाचे योग्य नमुना परीक्षण (सॅम्पलिंग) करण्याबाबत राज्याची भूमिका केंद्र सरकारकडे स्पष्टपणे मांडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात काढण्यात येणाऱ्या कोळसा पुरवठ्याच्या नव्या निविदांमध्ये निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्या आणि व्यवस्थेचा गैरफायदा घेणाऱ्या कंपन्यांना संधी मिळणार नाही, यासाठी आवश्यक तरतुदी करण्यात येतील, अशी ग्‍वाहीही फडणवीसांनी दिली.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी

राज्यातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून अधिक क्षमतेच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबतही वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकारने चंद्रपूर येथे ८०० मेगावॉट क्षमतेच्या सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सभागृहात दिली.

ऊर्जा व्यवस्थेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सहा कोलवाशरी कार्यरत आहेत. त्यापैकी राजुरा तालुक्यातील रुक्मिणी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कोलवाशरीतून महाजनकोला कोळसा पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा होत असल्याचे आरोप सातत्याने होत असल्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची मागणीही होत आहे. राज्यातील वाढती वीज गरज, वीज निर्मितीतील अडथळे आणि कोळसा पुरवठ्याच्या गुणवत्तेचा प्रश्न यामुळे ऊर्जा व्यवस्थेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकार आता यावर नेमकी कोणती ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT