चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरणाऱ्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलचे लोकार्पण सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडले. चंद्रपूर जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयामुळे विदर्भातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “चंद्रपूर हे माझे गाव आहे आणि अशा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण आपल्या गावात होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.” ते पुढे म्हणाले की, “शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या दोन मूलभूत गरजा आहेत. या सुविधा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कॅन्सर हा आजार एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाला मानसिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या हादरवून टाकतो.”
भागवत यांनी चंद्रपूरकरांच्या सहभागावर भर देत सांगितले की, “या रुग्णालयाच्या कार्यात चंद्रपूरच्या लोकांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. हे रुग्णालय केवळ उपचार केंद्र नसून चंद्रपूरच्या प्रतिष्ठेत भर घालणारे ठरेल.”
आपल्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “1964 नंतरचे जुने चंद्रपूर मी पाहिले आहे. तेव्हा शहराचा व्याप कमी होता आणि सर्व लोक एकत्र, आपुलकीने राहत होते. आज शहर विस्तारले असले तरी तीच सामाजिक एकात्मता आणि जबाबदारीची भावना या रुग्णालयाच्या माध्यमातून पुन्हा दिसली पाहिजे.”
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, “हे रुग्णालय योग्य पद्धतीने सुरू राहावे, सर्वसामान्य रुग्णांना सातत्याने सेवा मिळावी, ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या लोकार्पणामुळे जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील कॅन्सर रुग्णांना दर्जेदार उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असून, चंद्रपूर शहराचे आरोग्य क्षेत्रातील महत्त्व अधिक दृढ होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., पोलिस अधिक्षक मुम्मका सदर्शन, टाटा ट्रस्टचे संचालक डॉ. कैलाश शर्मा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदावाले आदी उपस्थित होते.
कॅन्सर केअर हॉस्पीटलमध्ये अशा आहेत सोयीसुविधा
चंद्रपूर जिल्हा खनीज विकास प्रतिष्ठान, टाटा ट्रस्ट आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 280 कोटी रुपये खर्च करून 2.35 लक्ष चौ. फूट एवढ्या जागेवर 140 बेडचे कॅन्सर केअर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. यात चंद्रपूर जिल्हा खनीज प्रतिष्ठानचा वाटा 210 कोटींचा आहे.
सदर रुग्णालयात जनरल वॉर्ड (30 बेड), सिंगल सुट (1 बेड), सिंगल वॉर्ड (4 बेड), शेअरींग वॉर्ड (12) आहेत. तसेच रुग्णालयात मेडीकल ऑनकोलॉजी, सर्जिकल ऑनकोलॉजी, रेडीएशन ऑनकोलॉजी, हिमॅटो ऑनकोलॉजी, पॅलेटिव्ह ॲन्ड सपोर्टिव्ह केअर, डे-केअर क्युमोथेरपी युनीट, पेन ॲन्ड सिम्प्टन मॅनजमेंट, क्रिटीकल केअर, सीटी स्कॅन, एम.आर.आय., डीजीटल एक्स – रे, मॅमोग्राफी, फ्ल्युरोस्कोपी, पॅथेलॉजी ॲन्ड हिस्टोपॅथेलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबॉयलॉली, रेडीएशन ऑनकोलॉजी, मॉलेक्युलर डायग्नोस्टिक, न्युक्लिअर मेडीसीन, फार्मसी ॲन्ड ब्लड बँक, न्युट्रीशन ॲन्ड फिजीओथेरपी, इमरजन्सी ॲन्ड क्रिटीकल केअर सुविधा आहेत.
तसेच रुग्णांकरीता ओ.पी.डी. आणि आय.पी.डी सर्व्हिस, मॉड्यूलर ऑपरेशन थेटर, प्रशस्त रिकव्हरी रुम, खाजगी रुम, आयसोलशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, डे-केअर ट्रिटमेंट एरीया, कौन्सिलिंग ॲन्ड पेशंट एज्युकेशन, इंशुरन्स, कॅशलेस सुविधा, 24/7 सपोर्ट सर्व्हिस सुविधा आहेत.