चंद्रपूर : माजी अर्थ मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकासकामांच्या सद्यस्थितीबाबत तसेच भविष्यातील आवश्यक प्रकल्पांविषयी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात विशेषतः चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची मागणी करण्यात आली. मुल शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून बायपास रोड निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामे, मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 च्या दुतर्फा काँक्रीटीकरणाची मागणी, तसेच या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्याची आवश्यकता यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
ना. गडकरी यांनी नेहमीप्रमाणेच संवेदनशीलतेने विषय ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या ठाम व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे देशातील रस्ते विकासाचा वेग वाढला असून चंद्रपूर जिल्ह्यालाही या विकासप्रवाहाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.