Marathwada flood affected families relief
चंद्रपूर : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील फडणवीस वाड्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी (28 सप्टेंबर) ला सकाळी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पूर स्थिती बद्दल माध्यमांशी संवाद साधला. मराठवड्यातील पुरस्थिती गंभीर असून प्रशासनाला तातडीच्या मदत कार्याचे निर्देश दिले आहेत. पुरग्रस्तांना तत्काळ 2 हजार कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. ज्याच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तातडीने 10 हजाराचा मदत दिली जात आहे. पुढचे दोन तीन दिवस गंभीर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना सांगितले. तत्पूर्वी त्यांनी खणीकर्म विभागाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण केले.
फडणवीस यांनी सांगितले की, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला असून पूरनिवारण व पुनर्वसनाबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करून आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने पूरनिवारणासाठी दोन हजार कोटी रुपये रिलिज केले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. घरामध्ये पाणी घुसलेल्या कुटुंबांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत दिली जात आहे. तसेच नागरिकांना अन्नधान्य व पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
काही भागांत जनावरांच्या चाऱ्यांची समस्या निर्माण झाली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ चारा पुरवठ्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज, उद्या आणि परवा हे दिवस पूरस्थितीच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट मोडवर राहून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे,” असे फडणवीस यांनी सांगितले. नद्यांमधील विसर्गावर लक्ष ठेवून, पाणी कुठे शिरू शकते याचा अंदाज घेऊन नागरिकांना आधीच बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे.
पुरस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देऊन, पंचनामे करताना कायद्याच्या अटींवर लोकांना त्रास होऊ नये. सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले. राज्याला नुकसानीचा अहवाल आल्यानंतर मदतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे फडणवीस म्हणाले.