Court Verdict  File Photo
चंद्रपूर

Chandrapur Court Verdict | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; सत्तुरने हल्ला करणाऱ्या पतीला ५ वर्षांची सक्तमजुरी

डोक्यावर, हातावर व पायावर वार करून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Domestic Violence Case

चंद्रपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर सत्तुरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखी एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावण्यात आला.

३ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास पीडित पत्नी हॉस्पिटलचे काम आटोपून घरी परतत होती. यावेळी आरोपी पतीने ब्रम्हपुरी येथील स्वागत मंगल कार्यालयाच्या मागील परिसरात तिला अडविले. त्याने तिला घरी चल असे सांगितले. मात्र, पत्नीने घरी जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत सत्तुरने तिच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर दोन-तीन वेळा वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरून तसेच वैद्यकीय अहवालाच्या आधारे ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८/२०२३, कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी चंद्रपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. सुधाकर डेगावार यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला कलम ३०७ भादंवि अंतर्गत दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे यांनी केला. न्यायालयीन पैरवी पोलीस अंमलदार प्रकाश शेंदरे यांनी केली. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांच्या समन्वयाने ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT