चंद्रपूर : सावली तालुक्यातील पाथरी परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षी वाघीणीला जेरबंद करण्यात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे. दोन दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. विशेषतः पाथरी येथील ६५ वर्षीय पांडुरंग चचाने या शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या वाघीणीच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रात पाथरी ते विरखल रोडवरील आसोला मेंढा मुख्य कालव्याजवळ शेतात निंदणीचे काम करत असताना पांडुरंग चचाने यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. त्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांत असंतोष वाढला. पुढे मानव-वन्यजीव संघर्ष वाढू नये यासाठी वाघीणीला पकडण्याचा दबाव वन विभागावर वाढला.
वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन दिवस सतत पाळत ठेवली. शार्पशूटर आणि रेस्क्यू टीमला पाचारण करून योग्य वेळ साधून आज, रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रँक्युलाईझ करून वाघीणीला जेरबंद करण्यात यश मिळाले.
वाघ पकडल्याची बातमी समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. या कामगिरीबद्दल सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आणि संपूर्ण रेस्क्यू टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.