चंद्रपूर : सोळाव्या शतकातील चंद्रपूर शहरातील झटपट नदीच्या काठावर स्थित असलेले अंचलेश्वर मंदिर आज महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांच्या गर्दीने फुलले आहे. येथील प्रसिद्ध शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती लावली आहे.
शिवाच्या आराधनेत रममाण होणा-या भक्तांसाठी चंद्रपूरचे अंचलेश्वर मंदिर हे आराध्य आहे. महाशिवरात्री निमित्त या मंदिरात शिवभक्तांची पुजेसाठी मोठी गर्दी उसळते. सोळाव्या शतकातील हे प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेले आहे. चंद्रपूरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं मंदिर असून या मंदिराच्या गाभा-यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार, जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं सोळाव्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. ऐतिहासिक नोंदीनुसार हे जलकुंड आजही मंदिराच्या गाभा-यात विद्यमान आहे. त्यात पाणीही आहे. आज महाशिवरात्री निमित्त पंचेश्वर मंदिरातील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रांगा लावले आहेत. एक एक करून भाविकांना शिवलिंगाच्या दर्शनासाठी आतमध्ये सोडल्या जाते. भाविक मनोभावे या ठिकाणी येऊन पूजा करीत आपली श्रद्धा व्यक्त करीत आहेत.
मंदिराच्या सभोवतालच्या कोरीव कामात कीर्तीमुख राक्षसाच्या १८० वेगवेगळ्या भावमुद्रा कोरलेल्या आहेत, ज्यामुळे मंदिराच्या स्थापत्यकलेचे महत्त्व अधोरेखित होते. भाविक या ठिकाणी शिवलिंगापुढे नतमस्तक झाल्यानंतर सभोवती असलेल्या मंदिर व परिसराची पाहणी करतात. त्यानंतर या ठिकाणावरून घरी परत जातात. आज सकाळपासून भाविकांची रेलचेल सुरू असून दिवसभर या ठिकाणी भावीक येऊन पूजा करणार आहेत.