चंद्रपूर

अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं केलं, कर्जबाजारी शेतकऱ्याने 6 एकरातील सोयाबीन पेटवले

Soybean crop damage: आर्थिक आणि मानसिक ताणामुळे हताश झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या सहा एक्करातील उभे पीक पेटवून दिल्याची घटना घडली आहे

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर: सततच्या परतीच्या अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले आहे. या आर्थिक आणि मानसिक ताणामुळे हताश झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या सहा एक्करातील उभे पीक पेटवून दिले. कोरपना तालुक्यातील कढोली गावातून ही अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रशांत मसे नावाच्या या शेतकऱ्याला यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

कोरपना तालुक्यातील कढोली येथील शेतकरी प्रशांत मसे यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात मोठ्या कष्टाने ६ एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली होती. त्यांनी नियमित खते, कीटकनाशके आणि अथक मेहनत घेऊन पीक चांगले उभे केले होते. मात्र, पीक काढणीच्या वेळेस सततच्या पावसाने त्यांच्या सर्व कष्टावर पाणी फिरवले.

पीक कापणीनंतर सोयाबीन शेतात वाळत ठेवले होते. परंतु, अवकाळी पावसाच्या पुनरागमनाने ते पुन्हा ओले झाले. ओलसरपणामुळे सोयाबीनच्या शेंगांमध्ये अंकुर फुटू लागले आणि कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे, थ्रेशर मशिन मालकानेच मळणी करण्यास स्पष्ट नकार दिला. सर्व प्रयत्न करूनही ओलसर झालेले सोयाबीन वाचवणे शक्य नसल्याचे पाहून प्रशांत मसे पूर्णपणे खचले. अखेर, हताश आणि व्यथित झालेल्या या शेतकऱ्याने आपले सहा एक्करवरील संपूर्ण सोयाबीन पीक पेटवून दिले. या घटनेमुळे त्यांचा सुमारे 25 हजारांचा कापणी खर्च वाया गेला, तसेच संपूर्ण उत्पादन नष्ट झाल्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

या घटनेची माहिती परिसरात पसरताच शेतकरी वर्गात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ पाहणी करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सर्व काही वाया गेले... या पिकासाठी आम्ही खते, बियाणे, मजुरी सर्व खर्च केला. पण सततच्या पावसामुळे सर्व काही वाया गेले. कोणीही मदतीला धावले नाही. आता पुढच्या हंगामासाठीही भांडवल शिल्लक राहिले नाही. सरकारने तातडीने मदत करायला पाहिजे.
प्रशांत मसे- नुकसानग्रस्त शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT