प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
चंद्रपूर

Chandrapur News : शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला; बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावर थरारक घटना

Chandrapur Leopard Attack :नागरिकांच्या आरडाओरड्यामुळे मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका

पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Leopard Attack

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: माता महाकालीच्या दर्शनासाठी कुटुंबासोबत पायी निघालेल्या नऊ वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) रात्री उशिरा बल्लारपूर–चंद्रपूर महामार्गावरील विसापूर येथील चुनाभट्टीजवळ घडली. बिबट्याने बालकाला जबड्यात पकडून बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने बालकाला सोडून दिले. या घटनेत बालकाच्या मानेवर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

बिबट्याची मुलावर अचानक झडप

कार्तिक जाधव (वय ९, रा. हैदराबाद) आत्याच्या घरी बल्लारपूर येथे आला होता. शनिवारी रात्री तो कुटुंबीयांसोबत माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी जात होता. विसापूर येथील चुनाभट्टीजवळील वळण रस्त्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली.

नागरिकांच्या आरडाओरड्यामुळे बिबट्याच्या तावडीतून सुटका

हल्ल्यानंतर बिबट्याने कार्तिकला जबड्यात पकडले आणि बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून उडी मारून त्याला आत नेण्याचा प्रयत्न केला. बालक बिबट्याच्या तावडीत सापडल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी जोरदार आरडाओरड सुरू केली. नागरिकांच्या आवाजामुळे बिबट्याने भिंतीवरून उडी मारताना बालकाला सोडून दिले; त्यामुळे कार्तिकची सुटका झाली.

वनविभाग आणि पोलीस पथकाची संयुक्त शोधमोहीम

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर वनविभागाचे आरएफओ राजेंद्र घोरुडे आणि बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग आणि पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. परिसरात शोध घेतल्यानंतर रात्री ११:३० वाजताच्या सुमारास कार्तिक बॉटनिकल गार्डनच्या भिंतीजवळ आढळून आला. बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या मानेवर जखमा झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

माता महाकालीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावरच बिबट्याने बालकावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या काळात दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांची वर्दळ लक्षात घेता या मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, वनविभागाने गस्त वाढवावी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT