man-eater tiger that killed a woman captured by forest department within just 36 hours.
चंद्रपूर/भिसी : भिसीपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी गावातील विद्या कैलास मसराम या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला होता. अखेर वनविभागाने केवळ ३६ तासांच्या प्रयत्नांत नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात यश मिळवले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेचा थरारक उलगडा
दिनांक १८ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास विद्या मसराम शेतात काम करत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला करून ठार मारले. या दुर्दैवी घटनेनंतर भिसी परिसरातील पुयारदंड, गडपिपरी, गोठणगांव, लावारी, मांगलगांव, चिचाळा, आंबोली आदी गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी तातडीने नरभक्षी वाघ जेरबंद करण्याची मागणी केली.
संतप्त जनतेचा आक्रोश – पोलिसांची मध्यस्थी
महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाविरोधात रोष व्यक्त केला. यावेळी आक्रोश इतका वाढला की काहींनी वनरक्षक बोरकर यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. वाढत्या तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी भिसी पोलीसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वन अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवली आणि परिस्थिती शांत केली.
वनविभागाची जलद कार्यवाही
नागरिकांच्या मागणीवरून वनविभागाने घटनास्थळ परिसरात तात्काळ ट्रॅप कॅमेरे बसवले. वाघ वारंवार त्या भागात फिरत असल्याचे कॅमेऱ्यातून स्पष्ट झाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला, घटनास्थळाजवळ पिंजरा लावण्यात आला. रात्री दहा वाजताच्या सुमारास वाघ पिंजऱ्यात अडकला आणि अखेर नरभक्षीचा धडकी भरवणारा प्रवास थांबला.नागरिकांची सुटका, वनविभागाचे कौतुक
वाघ जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. वनविभागाच्या दमदार कारवाईचे सर्वत्र स्वागत झाले असून, पुढील काळात जंगल परिसरातील वाघ व अन्य प्राण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मानव–प्राणी संघर्ष टाळण्यासाठी जंगलव्याप्त परिसरामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत. कॅमेऱ्यात एखादा प्राणी आढल्यास तात्काळ स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातील. नागरिकांनी शक्यतो जंगल परिसरात जाणे टाळावे. : रामदास नैताम, क्षेत्रसहाय्यक, वनविभाग भिसी