गोसेखुर्दच्या उपकालव्यावर मजुराचा मृतदेह आढळला  
चंद्रपूर

चंद्रपूर : गोसेखुर्दच्या उपकालव्यावर आढळला मजुराचा मृतदेह

मृत्यूचे कारण अस्पष्ट; नागरिकांमध्ये तर्कवितर्क

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील साठगाव-मायनर येथे कालव्याचे काम सुरू आहे. हे काम जवराबोडी, आसोला, आंबोली या शेत शिवारात सुरू असून शनिवारी (दि.५) सायंकाळी पाचच्या सुमारास ठेकेदाराकडे काम करणाऱ्या चिचाळा कुणबी येथील एका मजुराचा मृत्यू झाला. प्रशांत मधुकर येवले ( वय ३७) असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान रविवारी (दि.६) मृताचे कुटुंबीय व गावकऱ्यांनी मृतदेह घटनास्थळी नेवून ठेवला. उप कालव्याचे काम करीत असलेल्या ठेकेदाराने दीड लाखाची मदत व अंत्यसंस्काराला दहा हजाराची मदत केल्याने त्या युवकाच्या मृतदेहावर त्याचे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकरपूर परिसरात गोसेखुर्द प्रकल्पाच्या उप कालव्याचे काम ब्रह्मपुरी येथील गौड हे कंत्राटदार करीत आहेत. प्रशांत हा याच उपकालव्यावर  ट्रॅक्टरद्वारे पाणी मारण्याचे काम करीत होता. तो शनिवारी सकाळी  कामावर गेला होता . दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कॅनलवर मृत अवस्थेत तो आढळून आला. त्यानंतर तेथील मजुरांनी त्याच्या कुटुंबियांना व पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

प्रशांतच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नाही, परंतु नागरिकांमध्ये प्रशांतच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लावले जात होते. शंकरपूर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ, पोलीस हवालदार ननावरे, पोलीस शिपाई घोडमारे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. रविवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घटनास्थळी नेऊन ठेवला. जोपर्यंत कंत्राटदारांकडून मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी नागरिकांचा जमाव झाला. अखेर कंत्राटदाराने घटनास्थळी येऊन मृताच्या नातेवाईकांना दीड लाख रुपयाचा धनादेश व दहा हजार रुपये अंत्यसंस्कार विधीसाठी मृतदेह घटनास्थळावरून उचलण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT