चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणातून उघडकीस आलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे. तब्बल २० सुनावण्यांनंतर न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे तपास यंत्रणेला मोठे बळ मिळाले असून, आता पोलिसांनी अटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने प्रकरणातील गंभीर स्वरूप, आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि प्राथमिक पुरावे लक्षात घेऊन त्यांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे आता तपासात अडथळा राहिला नसून पोलिसांना थेट अटकेची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जामीन फेटाळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक डॉ. सिंग यांच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. या प्रकरणात आधीच सावकारी आणि छळाच्या आरोपांवर सहा आरोपींना अटक करण्यात आलेली असताना, आता किडनी विक्री रॅकेटच्या मुख्य सूत्रधारावर कारवाई होण्याची शक्यता बळावली काही.
नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारी कर्जाच्या जाचामुळे किडनी विकावी लागल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यानंतर सावकारी प्रकरणात गुन्हे दाखल, आरोपींच्या अटका, SIT तपास आणि शासनस्तरावर हस्तक्षेप अशा घडामोडी घडत आहेत.
किडनी विक्री रॅकेट देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असल्याचा संशय आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांना परदेशात पाठवणे, तेथे अमानुष काम करून घेणे आणि अखेरीस अवयव काढून घेणेअशा गंभीर आरोपांची चौकशी सुरू आहे. डॉ. सिंग यांच्या अटकेनंतर या रॅकेटमागील इतर प्रमुख आरोपी, एजंट, आर्थिक व्यवहार आणि परदेशातील संपर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांकडून या संपूर्ण साखळीचा मागोवा घेतला जात असून, नवीन मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.